Bisleri File Photo
राष्ट्रीय

Bisleri: बिस्लेरीचे पाणी प्यायचं की नाही? गोव्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही बिस्लेरीच्या पाण्यात आढळले जीवाणू

बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत आघाडीवर असलेल्या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीच्या पश्चिम बंगालमधील प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात कोलिफॉर्म जीवाणू आढळले आहेत.

मोहन कारंडे

Bisleri

नवी दिल्ली : बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत आघाडीवर असलेल्या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीच्या पश्चिम बंगालमधील प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात कोलिफॉर्म जीवाणू आढळले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. या आठवड्यात बिस्लेरीविरोधात ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गोव्यातील कंपनीच्या प्रकल्पातून घेतलेल्या नमुन्यातही त्रुटी आढळल्या होत्या.

पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील तेलीपारा गावात असलेल्या बिस्लेरीच्या प्रकल्पातून पाण्याचा नमुना घेण्यात आला होता. प्राथमिक तसेच संदर्भ प्रयोगशाळेने या नमुन्यात कोलिफॉर्म जीवाणू असल्याचे स्पष्ट केले.

कोलिफॉर्म जीवाणू कसा प्रवेश करतो?

कोलिफॉर्म जीवाणू सांडपाण्याची गळती, खराब झालेल्या पाइपलाइन किंवा अन्य माध्यमांतून पाणीपुरवठा व्यवस्थेत प्रवेश करू शकतात. या निष्कर्षांनंतर अन्न सुरक्षा प्राधिकरणाने १२ ऑगस्ट रोजी संबंधित उत्पादनाच्या ‘PB 201’ या विशिष्ट बॅचच्या विक्रीवर बंदी घातली होती. आता अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

गोव्यात बिस्लेरीच्या पाण्यात आढळले होते ब्रोमेट

बिस्लेरीविरोधातील ही कारवाई गोव्यातील कंपनीच्या प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात त्रुटी आढळल्यानंतर काही दिवसांतच करण्यात आली आहे. गोव्यातील प्रकरणात नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले होते. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत हा पाणी असुरक्षित घोषित करण्यात आले होते. या निष्कर्षांविरोधात बिस्लेरीने अपील केले होते. त्यानंतर संबंधित नमुना संदर्भ अन्न प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. मात्र, दुसऱ्या प्रयोगशाळेनेही नमुना असुरक्षित असल्याचे घोषित केले. FSSAIच्या माहितीनुसार, या नमुन्यात पॉलीन्यूक्लिअर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आढळले.

या निष्कर्षांमुळे असुरक्षित अन्नपदार्थांशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्राधिकरणाने अन्न सुरक्षा कायदा, २००६ अंतर्गत कंपनीविरोधात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, सोमवारी बिस्लेरी इंटरनॅशनलने आपली उत्पादने सेवनासाठी सुरक्षित असल्याचा दावा केला होता. तसेच, FSSAIने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी प्राधिकरणाला सहकार्य करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेवर देशभरात लक्ष

बिस्लेरीविरोधातील या कारवाया देशभरात बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख वाढवण्याच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या गुणवत्तेची तपासणी अधिक व्यापक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT