पुढारी ऑनलाईन डेस्क
बिहारचे सिंघम म्हणून ओळख असलेले मराठमोळे आयपीएस (IPS) अधिकारी शिवदीप वामनराव लांडे (Bihar IPS officer Shivdeep Lande) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे खळबळ उडाली आहे. लांडे यांची नुकतीच पूर्णिया आयुक्तालयाचे नवे आयजी म्हणजेच पोलिस महानिरीक्षक नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पदभारही स्वीकारला होता. त्यांनी चार जिल्ह्यांमध्ये ड्रग्ज प्रकरणी धडक कारवाई केली होती. त्यामुळे ते चर्चेत आहेत. पण त्यांनी अचानक त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून सरकारी पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले.
त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझा प्रिय बिहार, गेली १८ वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर मी पदाचा राजीनामा दिला आहे. इतक्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा मोठे मानले. एक सरकारी कर्मचारी म्हणून माझ्या कार्यकाळात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल बिहारवासीयांची माफी मागतो. मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे. तरीही मी बिहारमध्येच राहीन आणि पुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी राहील.' पण त्यांनी पुढे काय करणार? याबाबत काही स्पष्ट केलेले नाही.
लांडे हे २००६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमध्ये गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे सुपरकॉप म्हणून त्यांना ओळखले जाते. बिहार केडरचे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. बिहारमधून प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) मुंबईत गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये आयजी म्हणूनही काम केले होते. लांडे हे सध्या पोलीस महानिरीक्षक (पूर्णिया) आहेत. महाराष्ट्रात पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी लांडे हे पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक आणि मुंगेर आणि अररिया सारख्या जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस प्रमुखही राहिले होते. त्यांनी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून काम केले. २०२२ मध्ये ते बिहारमध्ये परतले आणि कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक ((DIG) म्हणून कामकाज सांभाळले. नंतर त्यांना तिरहुत विभागाचे पोलिस महानिरीक्षक (IG) म्हणून बढती देण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी त्यांची पूर्णिया येथे आयजी म्हणून बदली झाली होती. (Who is Shivdeep Lande)
शिवदीप लांडे यांच्या सरकारी सेवेतील राजीनाम्यानंतर ते निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. लांडे हे २०२५ मधील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडून पाटणामधील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात, असेही वृत्त समोर आले आहे.