पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे प्रत्येक राजकीय गोटात अस्वस्थता वाढली आहे. एक्झिट पोलमध्ये पुन्हा सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी त्यामागे नितीश कुमार यांनी महिलांसाठी केलेली कामे हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. मात्र, या अंदाजांवर ‘एनडीए’चे नेतेही समाधानी नाहीत. दुसरीकडे, ‘महाआघाडी’ने हे अंदाज पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. सर्वांनाच अंदाजापेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. पण, हेही तितकेच खरे आहे की, महिलांनी ज्याला मतदान केले असेल, त्याचेच सरकार स्थापन होईल. 14 तारखेला येणारे निकालच हे सिद्ध करतील की, महिला नितीश कुमारांसोबत राहिल्या की तेजस्वींच्या आश्वासनांकडे आकर्षित झाल्या.
या निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी 71.6% राहिली, जी पुरुषांच्या 62.8% पेक्षा खूप जास्त आहे. या आधारावर, महिलांची एकूण मते सुमारे 2.51 कोटी होतात. पुरुषांची मते या निवडणुकीत 2.97 कोटी इतकी पडली आहेत. ही संख्या महिलांच्या मतांपेक्षा 46 लाखांनी जास्त आहे.
नितीश कुमार यांनी महिलांसाठी जेवढी कामे केली आहेत, तेवढी देशातील इतर कोणत्याही राज्याने केलेली नाहीत. गेल्या 20 वर्षांपासून ते महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहेत. जीविका दीदी या संकल्पनेतून आज सुमारे 1.40 कोटी महिलांना संघटित केले.
जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर तर हे सर्व अंदाज एका झटक्यात फेटाळून लावतात. ‘यावेळेला 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडेन,’ या आपल्या दाव्यावर ते अजूनही ठाम आहेत. निवडणूक रणनीतीकार म्हणून आपले सर्व अंदाज खरे ठरल्याचा दावा प्रशांत किशोर करत असले, तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे अंदाज चुकले होते.