Nitish Kumar Bihar Politics: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जबरदस्त यश मिळवत 243 पैकी तब्बल 202 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. या निकालाने बिहारच्या राजकारणाचे समीकरण पुन्हा एकदा बदलले असून, राज्याचे अनुभवी नेते नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी चर्चा आहे. अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी, तेच पुढचे मुख्यमंत्री होणार असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहेत. या निमित्ताने नितीश कुमार यांच्या मागील 9 मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळांचा प्रवास कसा होता, ते पाहूया
1) 2000 : फक्त 7 दिवसांचा पहिला कार्यकाळ
मार्च 2000 मध्ये प्रथमच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र स्थिर बहुमत नसल्याने आणि अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे 7 दिवसांतच त्यांनी राजीनामा दिला.
2) 2005–2010 : पहिला पूर्ण कार्यकाळ
2005च्या निवडणुकीत NDAच्या विजयासह नितीश कुमारांनी पहिल्यांदा पूर्ण पाच वर्ष सरकारचं नेतृत्व केलं. कायदा-सुव्यवस्था, रस्ते, वीज आणि शिक्षणातील सुधारांमुळे त्यांची ओळख ‘सुशासन बाबू’ म्हणून झाली.
3) 2010–2014 : सलग दुसरी इनिंग्ज
2010 मध्ये पुन्हा प्रचंड बहुमत मिळाले. मुलींसाठी सायकल योजना, महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास हे या काळातील ठळक उपक्रम होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला.
4) 2015 : मांझी सरकारनंतर सत्तेत पुनरागमन
जीतनराम मांझी यांना CM बनवल्यानंतर दोघांमध्ये मतभेद वाढले. मांझींनी पद सोडल्यानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये नितीश पुन्हा मुख्यमंत्री झाले. हा अल्पकालीन कार्यकाळ 2015 च्या निवडणुकीपर्यंत चालला.
5) 2015–2017 : महाआघाडीचा ऐतिहासिक विजय
RJD–JDU–Congress या महाआघाडीला 2015 मध्ये विक्रमी विजय मिळाला आणि नितीश पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि तणावामुळे जुलै 2017 मध्ये त्यांनी अचानक राजीनामा दिला, ज्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला.
6) 2017–2020 : NDAसोबत पुन्हा हातमिळवणी
राजीनाम्यानंतर काही तासांतच त्यांनी NDAसोबत सरकार स्थापन केले. हे त्यांच्या राजकीय लवचिकतेचे आणि तडजोडीचे मोठे उदाहरण होते.
7) 2020 : JDU कमकुवत झाली, पण नितीश पुन्हा मुख्यमंत्री
2020 च्या निवडणुकीत JDUचा पराभव झाला, तरीही NDA सत्तेत परतली आणि नितीश कुमारांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.
8) 2022 : पुन्हा महाआघाडीत मोठा भूकंप
ऑगस्ट 2022 मध्ये त्यांनी NDA सोडून RJD–काँग्रेससोबत पुन्हा महाआघाडी स्थापन केली. BJPने JDUला तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
9) 2024 : पुन्हा NDAत पुनरागमन
जानेवारी 2024 मध्ये त्यांनी महाआघाडीवर नाराजी व्यक्त करून NDAत परत प्रवेश केला आणि नवव्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विरोधकांनी पलटी मारल्याची टीका केली, पण समर्थकांनी हे त्यांच्या अनुभवी राजकारणाचा भाग असल्याचे म्हटले.
बिहारच्या 2025 च्या निवडणुकीत NDAला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आता नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी खात्री राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. बिहारच्या राजकारणात दीर्घकाळ टिकून असणारे नितीश कुमार हे भारतीय राजकारणातील सर्वात यशस्वी नेत्यांपैकी एक मानले जातात.