Bihar news
भागलपूर : बिहारच्या भागलपूरमधून एका अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. नाती-नातवंडं असलेल्या ५० वर्षीय महिलेने अवघ्या १८ वर्षांच्या मुलासोबत लग्नगाठ बांधून समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या महिलेच्या मुलीने आणि जावयाने पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणात न्यायाची मागणी केली आहे.
५० वर्षांची वधू आणि १८ वर्षांचा वर, हा सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. हे प्रकरण घोघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पक्कीसराय गावातील आहे. येथील सल्लो मंडल यांचा अठरा वर्षीय मुलगा कन्हाई कुमार याने पन्नास वर्षीय महिला ज्योती देवी हिला वधू बनवून घरी आणले आहे. ही महिला आता आपला तरुण प्रियकर कन्हाई याची पत्नी म्हणून त्याच्याच घरी राहत आहे. समाजाची किंवा इतर लोकांची तिला कोणतीही लाज वाटत नाही. या संपूर्ण प्रकरणावर महिलेची विवाहित मुलगी गुडिया कुमारी हिने पोलीस ठाण्यात अर्ज देऊन आपल्या आईला सुखरूप घरी परत आणण्याची विनंती केली आहे. याबाबत पोलिसांनी ही चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिला आपल्या पती आणि मुलासोबत गुजरातमध्ये राहत होती. तिचा प्रियकर कन्हाई कुमार हा देखील तिच्या घराजवळच राहत होता. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि एक दिवस अचानक ती त्याच्यासोबत पळून गेली.
ज्योती देवी ही मूळची कहलगावच्या शोभनाथपूर गावची रहिवासी आहे. ती पळून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. तिचा पत्ता लागल्यानंतर तिची मुलगी, जावई आणि इतर नातेवाईक प्रियकर कन्हाईच्या घरी पोहोचले. नातेवाईकांच्या आग्रहावरून गावात पंचायतही बसवण्यात आली, पण त्यावेळी ही महिला लपून बसली होती. या महिलेला तीन मुली, एक मुलगा आहे. तिच्या एका विवाहित मुलीकडून तिला नातवंडेही आहेत.