El Nino India monsoon crop impact
नवी दिल्ली: या वर्षीचा 'एल निनो' गेल्या शंभर वर्षांतील सर्वात भीषण ठरण्याची शक्यता असून जागतिक हवामानात प्रचंड उलथापालथ होण्याचा इशारा ब्रिटनच्या हवामान विभागाने (मेट ऑफिस) शुक्रवारी दिला आहे. प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ३ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या हवामान बदलामुळे संपूर्ण जगासह भारताच्या शेती क्षेत्राला मोठा फटका बसणार असून, देशातील खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ब्रिटनच्या 'मेट ऑफिस'मधील हवामानशास्त्रज्ञ ॲडम स्केफ यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील तापमानातील ही वाढ अभूतपूर्व आहे. हवामान नोंदींमधील माहितीनुसार, यंदाच्या नोव्हेंबरमध्ये तापमानातील वाढ ३.९ अंश सेल्सिअस वाढीसह सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. जो २०१५ मधील सर्वात मोठ्या एल निनोच्या विक्रमालाही मागे टाकेल. एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक तापमानाचा उद्रेक होणार असून, २०२४ पेक्षा २०२७ हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
"ही एक अभूतपूर्व घटना आहे, हे आपण स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे," असे हवामानशास्त्रज्ञ स्केफ यांनी 'मेट ऑफिस'च्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले, "आमच्या अंदाजांमध्ये 'एल निनो'चे इतके तीव्र संकेत यापूर्वी कधीही पाहिले नाहीत." हवामान मॉडेलिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या स्केफ यांनी सांगितले की, जर हा अंदाज अचूक ठरला, तर २०२६ हे वर्ष एल निनो आणि त्याचे जागतिक हवामानावर होणारे परिणाम यांबाबतच्या आमच्या अलीकडील अनुभवांच्या पलीकडे जाणारे असेल. हे अल्पकालीन हवामानाचे अंदाज नाहीत. आपण येथे अत्यंत दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी राहणाऱ्या परिस्थितीबद्दल बोलत आहोत," असेही त्यांनी सांगितले.
'मेट ऑफिस'ने म्हटले आहे की, एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे भारतात आधीच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने यंदाच्या हंगामातील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो गेल्या ११ वर्षांतील सर्वात कमी आहे. पावसाने मारलेल्या ओढीमुळे सध्याच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागातील निरीक्षण आणि अंदाज गटाचे प्रमुख व शास्त्रज्ञ ओ. पी. श्रीजित यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर २०२७ हे वर्ष २०२४ ला मागे टाकून सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची मोठी शक्यता आहे. "भारतीय क्षेत्राचा विचार करता, येथील सरासरी तापमान २०२४ मधील विक्रमी तापमानापेक्षा जास्त न जाण्याची शक्यता आहे. हे सर्व २०२७ मधील मान्सून आणि त्यानंतरच्या 'एनसो' स्थितीवर अवलंबून असेल," असे ते म्हणाले. तरीही, पुढील वर्षी भारतात तीव्र उष्णतेच्या लाटा अनुभवण्यास मिळतील, असेही त्यांनी नमूद केले. याचा परिणाम चालू वर्षातील रब्बी पिकांपासून ते २०२७ पर्यंत जाणवू शकतो.
'एल निनो' ही हवामानातील एक नैसर्गिक घटना आहे. यात मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे जगभरातील वारे, वातावरणाचा दाब आणि पर्जन्यमान यांत बदल घडतात. ही घटना साधारणपणे दर दोन ते सात वर्षांनी घडते आणि नऊ ते बारा महिने राहते. 'एल निनो' हा शब्द १९ व्या शतकात पेरू आणि इक्वेडोरमधील मच्छिमारांनी तयार केला होता. ख्रिसमसच्या सुमारास किनाऱ्यालगत समुद्राच्या पाण्यात येणाऱ्या असामान्य उष्ण प्रवाहामुळे माशांची पकड कमी व्हायची, त्या घटनेसाठी त्यांनी हे नाव दिले होते. भारतात सहसा या प्रवाहामुळे मान्सून कमकुवत होतो.
या घटनेचा जागतिक तापमानावर सर्वाधिक प्रभाव ती सुरू झाल्याच्या पुढच्या वर्षी दिसून येतो; म्हणूनच २०२६ ऐवजी २०२७ हे वर्ष सर्वाधिक उष्णतेचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 'मेट ऑफिस'चे आणखी एक शास्त्रज्ञ निक डन्स्टोन यांनी सांगितले की, "२०२७ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून २०२४ ची जागा घेण्याची दाट शक्यता आहे." २०२४ मध्ये जागतिक तापमान हे औद्योगिक क्रांतीपूर्व पातळीच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले होते जी आंतरराष्ट्रीय हवामान करारांतर्गत निश्चित केलेली मर्यादा आहे.