

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गेल्या अनक दशकांपासून सायकल, दुचाकी किंवा पायी घरोघरी पत्रे पोहोचवणारा ‘डाकिया’ आता तंत्रज्ञानाच्या बळावर आकाशात झेपावला आहे. भारतीय टपाल विभागाने देशातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये जलद सेवा देण्यासाठी ड्रोन आधारित ‘लास्ट माईल डिलिव्हरी'चा पथदर्शी प्रकल्प शुक्रवारी (दि. २१) सुरू केला आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी मुख्य टपाल कार्यालय ते रेहरधर उप-टपाल कार्यालय या १२ किलोमीटरच्या डोंगरी मार्गावर ही पहिली यशस्वी मोहीम राबवण्यात आली. नेहमीच्या रस्ते मार्गाने या प्रवासाला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागायचा, तोच प्रवास ड्रोनने अवघ्या सात मिनिटांत पूर्ण केला. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत ड्रोनने आणलेले हे पार्सल रेहरधर येथे एका माजी सैनिकाला सुपूर्द करण्यात आले.
डोंगराळ आणि नद्या-नाल्यांच्या बिकट भौगोलिक रचनेमुळे ग्रामीण भागात टपाल पोहोचण्यास अनेकदा विलंब होतो. दुर्गम भागातील टपाल कार्यालये ही केवळ पत्रव्यवहारापुरती मर्यादित नसून पेन्शन, बँकिंग, बचत योजना, विमा आणि इतर सरकारी सेवांचा मुख्य आधार आहेत. रस्ते वाहतुकीतील अडचणींवर मात करून ड्रोनद्वारे थेट बॅगा पोहोचवल्यामुळे या सर्व नागरी सेवा अधिक जलद आणि वेळेवर उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या पथदर्शी प्रकल्पाचा विस्तार लवकरच मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. त्यानुसार हिमाचल प्रदेशातील ११० आणि आसाममधील ४० मार्गांवर ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. आसाममध्ये गुवाहाटी विभागातील हाजो उप-टपाल कार्यालयातून या सेवेची सुरुवात झाली असून एकट्या हाजो भागातून ८२ किलोमीटरचे नऊ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
* दोन तासांचे खडतर डोंगरी अंतर ड्रोनने अवघ्या ७ मिनिटांत पार केले.
* हे ड्रोन १० किलोपर्यंतचे टपाल ५ ते ८० कि.मी.अंतरापर्यंत नेण्यास सक्षम आहेत.
* या प्रकल्पांतर्गत हिमाचल प्रदेशात ११० तर आसाममध्ये ४० दुर्गम मार्गांवर सेवा दिली जाईल.
* दुर्गम भागांत पेन्शन, बँकिंग आणि सरकारी कागदपत्रे विनाविलंब पोहोचण्यास मदत होणार.
हा उपक्रम ‘स्काय एअर मोबिलिटी’ या ड्रोन तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने राबवला जात आहे. हे ड्रोन १० किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्यास सक्षम असून ५ ते ८० किलोमीटरच्या पल्ल्यात काम करू शकतात. ‘रिअल टाईम ट्रॅकिंग’ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहतूक नियंत्रणामुळे टपाल वितरण अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक बनले आहे.