Bengaluru crime news
बंगळूरू : बंगळुरूमधील व्हाईटफील्ड भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या १३ वर्षांच्या पोटच्या मुलीची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेवून जीवन संपवले. सुवर्णा चंद्रशेखर (वय ४५) आणि तारुण्या चंद्रशेखर (वय १३) अशी त्यांची नावे आहेत.
सुवर्णा यांचे पती चंद्रशेखर हे खासगी रुग्णालयात काम करतात. तर मुलगी तारुण्या सातवीमध्ये शिकत होती. हे कुटुंब आनंदात राहत होते. रविवारी रात्री सर्वांनी मिळून घरी क्रिकेटचा सामना पाहिला आणि त्यानंतर बाहेर हॉटेलमध्ये जेवायलाही गेले होते. हॉटेलमधून परतल्यानंतर सुवर्णा यांनी पतीला सांगितले होते की, "मी खूप थकले आहे, उद्या सकाळी नाश्ता बनवणार नाही."
त्यानंतर नेहमीप्रमाणे चंद्रशेखर दुसऱ्या खोलीत झोपले होते. सकाळी सुवर्णा यांना त्रास नको म्हणून त्यांनी बाहेरच नाश्ता केला आणि कामावर निघून गेले. मात्र, सुवर्णा यांच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते, याची पुसटशी कल्पनाही त्यांना आली नाही.
सोमवारी सकाळी चंद्रशेखर यांनी पत्नीला वारंवार फोन केले, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी आपल्या धाकट्या भावाला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. सकाळी ११ च्या सुमारास धाकटा भाऊ घरी पोहोचला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता सुवर्णा यांनी छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे आणि मुलगी तारुण्या बेडवर मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुवर्णा यांनी प्रथम मुलीच्या तोंडावर उशी दाबून तिचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेतला. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. "सुवर्णा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होत्या. माझे काही झाले तर मुलीचा सांभाळ कोण करेल? अशी चिंता त्या सतत व्यक्त करायच्या. तसेच पतीच्या हृदयविकाराच्या त्रासामुळेही त्या काळजीत होत्या," असे पोलिसांनी सांगितले.