

चांदवड (नाशिक) : गाडी व मोबाईल घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरकडील मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर माहेरकडील नातेवाईकांनी विवाहितेवर सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केला.
मोहिनी चंद्रकात आहिरे असे जीवनयात्रा संपविलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मोहिनी हीचे वहील धोंडीराम प्रभाकर गायकवाड (४२, दहीवद, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल फिर्यादीनुसार धोंडीराम गायकवाड यांची मुलगी मोहिनी हिचा पिंपळगाव धाबळी येथील चंद्रकांत आहिरे यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळीने गाडी व मोबाईल घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी केली. लग्नात काही दिले नाही, घरसंसारासाठी सामान घेऊन ये असे म्हणत मोहिनीस वारंवार त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून मोहिनीने शुक्रवार (दि.7) गळफास घेतला. घटना लक्षात येताच तीला तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांंनी मृत घोषीत केले. दरम्यान, विवाहितेच्या नातेवाईकांनी मृतदेह घेऊन थेट सासरच्या घरासमोरच शनिवारी (दि.8) अत्यंस्कार केले. यामुळे काहीवेळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी विवाहितेचा पती चंद्रकांत आहिरे, सासू अनिता आहिरे, सासरे प्रकाश आहिरे, भाया संदीप आहिरे, नणंद सरिता आहिरे व पूजा आहिरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद मोरे पुढील तपास करीत आहे.