Bengaluru News file photo
राष्ट्रीय

Bengaluru News: AI मुळे नोकरी गेल्याने इंजिनिअरने जीवन संपवले; पतीचा मृतदेह पाहून पत्नीनेही १८ व्या मजल्यावरून उडी मारली

बंगळूरूमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याच्या आयुष्याचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

बंगळूरू: बंगळूरूमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याच्या आयुष्याचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे. अमेरिकेतील नोकरी गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून ३२ वर्षीय आयटी इंजिनिअरने गळफास लावून जीवन संपवले. पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून, अवघ्या २० मिनिटांच्या आत त्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पत्नीनेही इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. उत्तर बेंगळुरूच्या कोथानूर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

भानू चंदर रेड्डी (वय ३२) आणि बिबी शाझिया सिराज असे या मृत दाम्पत्याचे नाव असून ते तेलंगणाचे मूळ रहिवासी होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाझिया ही गुरुवारी सकाळी हैदराबादवरून बंगळुरूला परतली होती. सकाळी ७:३० च्या सुमारास तिने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार फोन करूनही भानू फोन उचलत नसल्याने तिने सुरक्षा रक्षकांना बोलावले. सुरक्षा रक्षकांनी बेडरुमचा दरवाजा तोडला असता, भानू गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

पतीचा मृतदेह पाहून धक्का बसला; २० मिनिटांनी आपणही जीव दिला

पतीचा मृतदेह पाहून शाझियाला धक्का बसला. शेजारी आणि पोलीस घटनास्थळी जमा होत असतानाच, २० मिनिटांनी कोणाचेही लक्ष नसताना तिने इमारतीचा १८ वा मजला गाठला आणि तिथून खाली उडी मारली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

'AI' मुळे नोकरी गेली अन् होत्याच नव्हतं झालं

भानू रेड्डी हा गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत कामाला होता. गेल्या वर्षी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) मुळे आयटी क्षेत्रात झालेल्या कर्मचारी कपातीचा फटका भानूलाही बसला. त्याला आपली नोकरी गमवावी लागली. त्यानंतर भारतात परतल्यापासून तो नोकरीच्या शोधात होता. बेरोजगारीमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण, आरोग्य समस्या आणि प्रचंड मानसिक दडपण यामुळे तो नैराश्यात होता.

भानू आणि आणि बिबी शाझियाने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. हा विवाह आंतरधर्मीय असल्याने त्यांनी तो मुलीच्या कुटुंबीयांपासून गुप्त ठेवला होता. आठ महिन्यांपूर्वीच शाझियाला बंगळुरूमध्ये एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाल्याने ते येथे स्थायिक झाले होते. शाझिया नोकरी करत असली, तरी भानूच्या बेरोजगारीमुळे त्यांच्यावर तणाव होता. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये भानूने आपल्या आरोग्याविषयीच्या तक्रारी आणि नोकरी नसल्याने येणाऱ्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT