Beed crime news | माता न तू वैरिणी: 'बाथरूमला जाते' सांगून पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकलीला आईनेच सोडले बेवारस

परळी बसस्थानकातील हृदयद्रावक घटना
Beed crime news
Beed crime news
Published on
Updated on

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ बसस्थानक परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या वयात चिमुकलीने आईच्या कुशीत असायला हवे, त्याच वयात तिच्या जन्मदात्रीनेच 'बाथरूमला जाऊन येते' असे सांगून तिला उघड्यावर सोडून दिल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परळी बसस्थानक परिसरात ही दीड वर्षांची मुलगी एकटीच बेवारस अवस्थेत आढळून आली. बसस्थानकावरील गर्दी, गोंधळ आणि वाहनांच्या वर्दळीत ती निरागस डोळ्यांनी केवळ आपल्या आईचा शोध घेत होती. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून या मुलीला तातडीने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यानंतर तिची रवानगी शिशुगृहात करण्यात आली.

गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी आशा शिशुगृह (परभणी) चे अधीक्षक सालोमन मायकल कसबेकर यांनी २६ मार्च २०२६ रोजी परळी वैजनाथ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. टी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आईचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांना आवाहन

या घटनेमुळे परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणाऱ्या मातेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संबंधित मुलीच्या पालकांचा शोध सुरू केला असून, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या मुलीबाबत किंवा तिच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ परळी वैजनाथ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news