चिकोडी : चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी आज उच्च न्यायालयाने आरसीबी, डीएनए कंपनी आणि केएससीए यांना नोटीस बजावली आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून २०२५ रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)च्या आयपीएल विजयाच्या उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५६ हून अधिक जण जखमी झाले.
या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून (सु-मोटो) जनहित याचिका दाखल करत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी), इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) यांना नोटीस बजावली आहे. याचिकेची पुढील सुनावणी २३ जून २०२५ रोजी निश्चित करण्यात आली आहे. या दुर्घटनेची चौकशी करुन राज्य सरकारने या प्रकरणाबाबत न्यायालयाला अहवाल सादर केला आहे.
सध्या जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत आणि पोलीस प्रशासनाने घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील अनियंत्रित गर्दीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते सध्याही असे व्हिडीओ व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
४ जून रोजी आरसीबीच्या ऐतिहासिक आयपीएल विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेमुळे कर्नाटकातील प्रशासन, पोलिस आणि आयोजक संस्थांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. न्यायालयीन चौकशी आणि २३ रोजी होणाऱ्या सुनावणीमुळे या प्रकरणातील संबधित काय कारवाई होणार याकडे अनेकांच लक्ष लागून राहिले आहे.