

बंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत राज्य बाल आयोगाने सीआयडी आणि बंगळूर पोलिसांना नोटीस बजावल्या आहेत. त्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांवरून बाल आयोगाने स्वतःहून खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेत अनेक मुले गंभीर जखमी झाली आहेत. काही मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आयोगाने सीआयडी आणि बंगळूर पोलिसांना पत्र लिहून या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून चेंगराचेंगरीच्या घटनेतील 11 जणांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. आयोगाला लिहिलेल्या पत्रात अशोक यांनी या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.