Bengaluru stampede RCB felicitation M Chinnaswamy Stadium incident DK Shivakumar BCCI vice president Rajeev Shukla
बंगळुरू/नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) ने आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद जिंकल्यानंतर बुधवारी 4 जून रोजी कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या भयावह चेंगराचेंगरीत किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
या पार्श्वभुमीवर बोलताना BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ही घटना अचानक घडली. याचे राजकारण करू नये. मृतांच्या कुटूंबियांना मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
राजीव शुक्ला म्हणाले, "अशा घटना कोणत्याही राज्यात घडू शकतात, आणि त्यासाठी सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरू नये. याचे राजकारण करू नये. ही घटना जर एखाद्या भाजपशासित राज्यात घडली असती, तरी आपण त्यांना दोष दिला नसता. तिथे खूप मोठी गर्दी जमली होती. मी फ्रँचायझीशीही बोललो, त्यांनाही इतकी मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा नव्हती. ही घटना अचानक घडली. मृतांच्या कुटुंबियांना शक्य तितकी मदत दिली जावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
ते म्हणाले, "चेंगराचेंगरी किंवा अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने रोड शो थांबवला होता. मात्र, स्टेडियमच्या बाहेर अशी चेंगराचेंगरी होईल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. आता झालेल्या नुकसानावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे."
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा सत्कार सोहळा केवळ 10-15 मिनिटांत आटोपता घेतल्याचे म्हटले आहे.
शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "सत्काराचा कार्यक्रम आम्ही लवकर संपवला. कार्यक्रम 10 ते 15 मिनिटांत संपवण्यात आला. परिस्थिती सामान्य करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत."
ते म्हणाले की, पोलिस आयुक्त व अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. मी रुग्णालयात भेट देणार आहे, मात्र उपचारांमध्ये हस्तक्षेप नको म्हणून थोडा वेळ थांबतो आहे. नेमकी संख्या सांगता येणार नाही, परंतु आम्ही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहोत.
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी चिन्नास्वामी स्टेडियमजवळील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या दुर्दैवी घटनेची जबाबदारी कर्नाटक सरकारने स्वीकारली पाहिजे.
कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र म्हणाले की, - राज्य सरकारने या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश आणि कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा राज्य सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता विजयी रॅली काढण्याची घाई केली, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. राज्य सरकारने कधीही पूर्वतयारीची पर्वा केली नाही. त्यांना केवळ प्रसिद्धीमध्ये जास्त रस होता. काही लोक आयसीयूमध्ये आहेत. मी काही पीडितांशी बोललो, आत पोलिस नव्हते, रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण न्यायालयीन चौकशीसाठी पाठवावे.
आरसीबीच्या सत्कारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. परंतु आयोजकांकडून योग्य ती गर्दी नियंत्रणाची व्यवस्था न केल्याने मोठा अनर्थ घडल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी आणि नेत्यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
या कार्यक्रमासाठी कोणतीही तिकीट व्यवस्था नव्हती, त्यामुळे हजारो नागरिक बिनधास्तपणे स्टेडियमच्या दिशेने गर्दी करू लागले. या रेट्यात चेंगराचेंगरी झाली आणि अनेकजण चिरडले गेले.
कर्नाटक सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली जात आहे, आणि मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.