Bengaluru crime news:
बेंगळूर : एका सुतारकाम करणाऱ्या तरूणाने आपल्या गर्भवती पत्नीची कुत्र्याच्या पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीनव संपवले. दक्षिण बंगळूरमधील चन्नमनकेरे अच्चुकट्टू परिसरात ही धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
स्वप्ना कुमार असे मृत पत्नीचे तर मनोज कुमार (वय ३०) असे पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेले मनोज आणि स्वप्ना काही वर्षांपूर्वी रोजगारासाठी बेंगळूरमध्ये आले होते. गेल्या वर्षीपासून हे दाम्पत्य दक्षिण बेंगळूरमधील चन्नमनकेरे अच्चुकट्टू येथे भाड्याच्या घरात राहत होते.
गुरुवारी दुपारच्या सुमारास घरमालकाने पोलिसांना फोन करून दाम्पत्यामध्ये जोरदार वाद झाल्याचे सांगितले. त्यानंतर घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दाखल होत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, खोलीत स्वप्नाचा मृतदेह आढळला. तर मनोज कुमार याचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्राथमिक तपासात मनोज याने कुत्र्याच्या पट्ट्याचा वापर करून पत्नीचा गळा आवळल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. या घटनेमागील नेमक कारण काय? याचा शोध घेण्यासाठी पोलीस दाम्पत्याचे मोबाईल फोन तपासत असून त्यातील संदेश आणि कॉल रेकॉर्डचीही छाननी केली जात आहे.