Bengaluru murder case
बंगळुरू: बंगळुरूमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सामना हरल्यानंतर मैदानावरच दोन मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मित्रानेच कार झाडावर आदळून दुसऱ्या मित्राची हत्या केली. प्रशांत (वय 33, रा. हेब्बागोडी) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी त्याचा मित्र रोशन हेगडे (वय 37) याला अटक केली आहे.
ही घटना रविवारी रात्री घडली असून कारच्या डॅशकॅममध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. प्रशांत आणि रोशन हेगडे हे दोघे मित्र होते. रोशन हा एका ऑटो कंपनीत कामाला आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्यांचा संघ हरल्यानंतर त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. मैदानावर सुरू झालेला हा वाद तिथेच थांबला नाही.
रात्री मद्यपान केल्यानंतर रोशनच्या एसयूव्ही कारमधून जात असताना त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडण झाले. यानंतर प्रशांत आपल्या कारने जाण्यासाठी उतरला. तेव्हा रोशनने त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने कारचा वेग वाढवला आणि त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रशांतने कार थांबवण्यासाठी कारच्या फूटरेस्टवर उभा राहून दरवाजाला लटकत राहिला. यावेळी रोशनने मुद्दाम गाडी जोरात एका झाडावर नेऊन धडकवली.
या भीषण अपघातात प्रशांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत रोशनदेखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून रोशनला अटक केली आहे.