Crime News file photo
राष्ट्रीय

Bengaluru hotel crime: पंचतारांकित हॉटेलात बापाने दोन मुलींची हत्या केली, नंतर स्वतःचा गळा चिरला; चिठ्ठीत धक्कादायक कारण उघड

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मनाला सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून एका बापाने आपल्या अवघ्या १० आणि ५ वर्षांच्या दोन मुलींची गळा आवळून हत्या केली.

पुढारी वृत्तसेवा

Bengaluru hotel crime:

बेंगळूर: बेंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मनाला सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून एका ४० वर्षीय बापाने आपल्या अवघ्या १० आणि ५ वर्षांच्या दोन मुलींची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

शेख झेहरा (वय ५ वर्ष) आणि शेख झोया (वय १० वर्ष) अशी मृत मुलींची नावे आहेत. तर एस. जी. इम्रान असे आरोपी पित्याचे नाव आहे. इम्रान हा नागावरा मुख्य रस्त्याजवळील बिलालनगरचा रहिवासी असून एका खासगी कॅब कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.

दुबईहून पाहुणे येणार असल्याचे सांगितले अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान रविवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील एका खोलीत दोन्ही मुलींसह उतरला होता. 'दुबईहून येणाऱ्या एका पाहुण्याला घेण्यासाठी आलो असून सोमवारी सकाळी हॉटेल सोडणार आहे', असे त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले होते.

असा उघडकीस आला प्रकार

सोमवारी सकाळी मुदत संपल्यानंतरही इम्रान खोलीबाहेर आला नाही. दुपारी १२:३० वाजता आणि पुन्हा ४:३० वाजता हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सायंकाळी ५:३० च्या सुमारास संशय आल्याने हॉटेल मॅनेजरने मास्टर कि च्या साह्याने खोलीचा दरवाजा उघडला.

दरवाजा उघडताच आतमध्ये दोन्ही चिमुरड्यांचे मृतदेह खाटाजवळ पडलेले होते, तर इम्रान हा रक्ताच्या थारोळ्यात सोफ्याजवळ बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून तिघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोन्ही मुलींना तपासून मृत घोषित केले. इम्रानची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

'पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे उचलले पाऊल'

घटनास्थळावरून पोलिसांना एक मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून ती इम्राननेच लिहिल्याचा संशय आहे. "पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे मी आयुष्याला पूर्णपणे कंटाळलो आहे. तिचे अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत. तिने मला प्रचंड मानसिक त्रास दिला आहे, म्हणूनच मी माझ्या दोन्ही मुलींना माझ्यासोबत घेऊन जात आहे," असा मजकूर या चिठ्ठीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT