Congress MLA Baraiya rape remark controversy
भोपाळ : "सुंदर तरुणी पुरुषाचे मन विचलित करू शकते, ज्यामुळे बलात्कार होतात," असे अत्यंत वादग्रस्त विधान मध्य प्रदेशातील भांडेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार फूलसिंग बरैया यांनी केले आहे. या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून बरैया यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
एका मुलाखतीवेळी फूलसिंग बरैया "भारतात बलात्काराचे सर्वाधिक बळी कोण आहेत? तर ते एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील लोक आहेत. बलात्काराचा सिद्धांत असा आहे की, एखादा पुरुष रस्त्याने जात असताना त्याला एखादी सुंदर तरुणी दिसली, तर त्याचे मन विचलित होते आणि तो बलात्कार करतो."
"एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील महिला सुंदर नसतात, तरीही त्यांच्यावर बलात्कार होतात, कारण तसे त्यांच्या धर्मग्रंथात लिहिले आहे, असे 'रुद्रयामल तंत्र' नावाच्या पुस्तकाचा दाखला देत बरैया म्हणाले की, विशिष्ट जातीच्या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्यास तीर्थयात्रेइतके पुण्य मिळते, अशा विकृत विचारसरणीमुळे या घटना घडतात, असे अत्यंत धक्कादायक दावाही त्यांनी केला.
भाजपने बरैया यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मध्य प्रदेश भाजपचे माध्यत प्रभारी आशिष अग्रवाल यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, "महिलांना 'सौंदर्याच्या' तराजूत तोलणे आणि दलित-आदिवासी महिलांवरील अत्याचाराला 'पुण्यांचे काम' म्हणणे ही केवळ घसरलेली जीभ नसून, ती एक विकृत आणि गुन्हेगारी मानसिकता आहे. राहुल गांधी सध्या मध्य प्रदेश दौऱ्यावर असतानाच त्यांच्या आमदाराने असे विधान केल्याने, काँग्रेसची 'संविधान बचाव' मोहीम केवळ ढोंग आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही या वादग्रस्त विधानाची गंभीर दखल घेतली असून, "फूलसिंग बरैया समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. काँग्रेसने त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी," अशी मागणी केली आहे.
"बलात्काराचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. बलात्कार करणारा हा केवळ गुन्हेगार असतो, त्याचा धर्म किंवा जातीशी संबंध जोडणे चुकीचे आहे.", असे मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र बैरया यांच्या कोणती कारवाई करणार याबाबत त्यांनी मौनच बाळगले.
अखिल भारतीय ब्राह्मण समाजानेही या विधानाचा निषेध केला आहे. प्रदेशाध्यक्ष पुष्पेंद्र मिश्रा यांनी म्हटले की, असे विधान केवळ महिलांचाच नाही तर संपूर्ण समाजाचा अपमान आहे. यापूर्वीही बरैया यांनी एससी-एसटी समाजाबाबत वादग्रस्त विधाने केले आहेत.