West Bengal crime news : कोलकाताजवळील बारुईपूर येथे रविवारी (दि. ५ जुलै) एका १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह पोत्यात आढळून आल्‍यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.  Pudhari
राष्ट्रीय

Crime News : पोत्यात सापडला १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह, जमावाने संशयिताला ठेचले; प. बंगालमध्ये प्रचंड तणाव

पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा ममता बॅनर्जींचा दावा

पुढारी वृत्तसेवा

West Bengal crime news : कोलकाताजवळील बारुईपूर येथे रविवारी (दि. ५ जुलै) एका १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह पोत्यात आढळून आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी बलात्कार आणि हत्येचा संशय असलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत चिमुरडी शनिवारी आपल्या मैत्रिणीसाठी भेटवस्तू (गिफ्ट) खरेदीसाठी घराबाहेर पडली होती, तेव्हापासून ती बेपत्ता होती. चार जणांनी तिला बळजबरीने पळवून नेल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.

मुलीचा मृतदेह पोत्यात सापडल्याने परिसरात प्रचंड तणाव

मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर बारुईपूर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त स्थानिकांनी हिंसक निदर्शने करत रस्ते अडवले, टायर जाळले आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली. अमानुष कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रेसिडेन्सी रेंजचे पोलीस महानिरीक्षक (IG) कंकरप्रसाद बरुई यांनी दिल्यानंतरच आंदोलकांनी रस्ता रोको मागे घेतला. या मुलीच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली.

मुख्यमंत्री अधिकारी यांनी केली पीडितेच्या वडिलांशी चर्चा

"कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही," असे सांगत पोलीस महानिरीक्षक बरुई यांनी मुलीच्या आई-वडिलांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मुलीच्या वडिलांशी फोनवर चर्चा केली असून, मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. "सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना शिक्षा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी मला फोनवर सांगितले आहे," अशी माहिती बरुई यांनी आंदोलकांना दिली आणि त्यांना रस्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. या आश्वासनानंतर आंदोलकांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची परवानगी दिली. मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता की नाही, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

ममता बॅनर्जींचा नजरकैदेचा दावा

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचा दावाही पक्षाने केला आहे. "आम्हाला तिथे जाण्यापासून रोखण्यासाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. घराबाहेर तैनात केलेला पोलीस फौजफाटा याचा पुरावा आहे. परिसरात कलम १४४ लागू नसतानाही माझ्या घरासमोर रूट मार्च का केला जात आहे? केंद्रीय दलांसह इतक्या मोठ्या संख्येने पोलीस येथे तैनात करण्याची काय गरज आहे?" असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

भाजपकडून केवळ पोकळ आश्वासन : अभिषेक बॅनर्जी

तसेच, या तपासावर राजकीय प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे. "भाजपने महिलांच्या सुरक्षेचे आश्वासन देऊन बंगालमध्ये सत्ता मिळवली. पण, आता अशा प्रत्येक घटनेमुळे त्यांच्या पोकळ आश्वासनांवर नवे प्रश्न उपस्थित होत आहेत," असे तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT