Pudhari
राष्ट्रीय

Banke Bihari Temple : बांके बिहारी मंदिरात दान होणार एक-एक पैसा मंदिराच्या तिजोरीतच जमा झाला पाहिजे; सर्वोच्च न्यायालय

मंदिरात होणारी दानाची चोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही

पुढारी वृत्तसेवा

Banke Bihari Temple donation Supreme Court

वृंदावन येथील प्रसिद्ध श्री बांके बिहारी महाराज मंदिरातील दान होणार्‍या रकमेत होणाऱ्या हेराफेरीच्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. मंदिरात भाविकांनी अर्पण केलेला एक-एक पैसा दानपेटीत किंवा ऑनलाइन माध्यमातून थेट मंदिराच्या अधिकृत तिजोरीतच जमा झाला पाहिजे, असे स्पष्ट आणि कडक निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. मंदिरात होणारी दान चोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

'दान झालेला एक-एक पैसा तिजोरीतच गेला पाहिजे'

सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर बांके बिहारी मंदिराच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाशी संबंधित याचिकांवर सुनावणी झाली. मंदिरातील दान झालेल्‍या रकमेत कथित गैरव्यवहार होत असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने निर्देश दिले की, भाविकांनी दिलेले दान थेट मंदिराच्या तिजोरीतच जमा झाले पाहिजे. सेवायत (पुजारी) किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने यामध्ये अडथळा आणल्यास ती बाब अत्यंत गांभीर्याने घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पारदर्शक व्यवस्था लागू करण्याचे आदेश

मंदिरात होणाऱ्या गोंधळास आळा घालण्यासाठी आणि सर्व दान करण्‍यात आलेल्‍या पैशांच्‍या योग्य हिशेब ठेवला जाईल याची खात्री करण्यासाठी एक पारदर्शक व्यवस्था लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने मंदिर व्यवस्थापन समितीला दिले आहेत. तसेच, मंदिराच्या निधीतून कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा प्रस्ताव असल्यास, तो व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी न्यायालयाच्या निदर्शनास आणणे बंधनकारक असेल. मंदिराशी संबंधित कोणतीही व्यक्ती तिजोरीत जमा होण्यापूर्वी हे दान स्वतःकडे ठेवू शकत नाही, यावर न्यायालयाने भर दिला.

व्यवस्थापनात यापूर्वीच केले होते बदल

दरम्यान, याआधी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने बांके बिहारी मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल केला होता. मंदिराच्या उच्चस्तरीय समितीमध्ये गोस्वामी समाजाचे प्रतिनिधी निवडताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. लोकशाही मार्गाने निवडून आलेले प्रतिनिधीच या समितीमध्ये समाजाची बाजू मांडतील, असा निर्णय न्यायालयाने दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT