पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंसाचाराचा आगडोंब उसळल्यानंतर (Bangladesh Protest) पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून बाहेर पडलेल्या शेख हसिना (Sheikh Hasina) यांचे विमान भारतातील गाझियाबाद येथील हिंडन एअर बेसवर उतरलेले आहे. शेख हसिना भारतात आश्रय घेतील, का त्या लंडनला रवाना होतील याबाबत मात्र स्पष्टता होऊ शकलेली नाही.
बांगलादेशात आरक्षणविरोधात आंदोलन सुरू आहेत. यात आतापर्यंत ३००वर लोकांचा बळी गेला आहे. आंदोलकांनी आज बांगलादेशची राजधानी ढाका येथे रॅलीचे आयोजन केले. यात जवळपास पाच लाख युवक, नागरिकांचा समावेश होता. आंदोलकांनी पंतप्रधान निवासाकडे जायला सुरू केल्यानंतर शेख हसिना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लष्कराने बंगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली.
दरम्यान शेख हसिना नेमका कोठे आश्रय घेतील, याबद्दल स्पष्टता दिसून येत नाही. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार शेख हसिना लंडन येथे आश्रय घेणार आहेत.
बंगलादेशाने भारताची हवाई हद्द वापरण्यास मिळावी अशी विनंती केली होती. ती भारताने मान्य केली. त्यानंतर शेख हसिना लष्करी विमानाने गाझियाबाद येथील भारतीय वायुसेनेच्या विमानतळावर दाखल झाल्या. आता याच विमानाने त्या लंडनला जातील की त्यांच्यासाठी दुसरे विमान उपलब्ध करून दिले जाईल, याबद्दल स्पष्टता नसल्याचे हिंदुस्तान टाइम्सने म्हटले आहे.