Bengaluru prison parappana agrahara viral video
बेंगळुरू : बेंगळुरू येथील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा कैद्यांच्या ऐशोआराम आणि व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे चर्चेत आले आहे. तुरुंगातील कैदी चक्क दारू, चखना आणि गाण्यांवर नाचत रात्रभर धिंगाणा घालत असल्याचे नवीन व्हिडिओ समोर आले असून, त्याने मोठी खळबळ उडली आहे.
या नवीन व्हिडिओंमध्ये कैदी एकत्र येऊन गाणी म्हणत आहेत, नाचत आहेत आणि तेथील ताट व मग्सचा वापर संगीत वाद्य म्हणून करताना दिसत आहेत. याचवेळी ते आनंदाने "पार्टी ऑल नाईट" असे ओरडत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीचे व्हीआयपी ट्रीटमेंटचे व्हिडिओ २०२३ सालचे असले तरी, शनिवारी प्रसिद्ध झालेले हे 'पार्टी'चे व्हिडिओ फक्त एका आठवड्यापूर्वीचे असल्याची चर्चा आहे.
मागील आठवड्यात याच कारागृहातील अनेक धोकादायक असलेल्या कैद्यांना व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. यात एका आयएसआयएस (ISIS) रिक्रूटरचा आणि कुख्यात सीरियल बलात्कारी उमेश रेड्डी याचा समावेश होता. व्हिडिओमध्ये उमेश रेड्डी कथितरित्या मोबाईल फोन वापरताना, तर काही कैदी टीव्ही पाहताना दिसत होते. तसेच, सोने तस्करी प्रकरणात अडकलेला तेलुगु अभिनेता तरुण देखील वेगळ्या क्लिपमध्ये दिसला आहे.
ही गंभीर बाब समोर आल्यानंतर कर्नाटकचे तुरुंग महासंचालकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त महानिरीक्षक पी.व्ही. आनंद रेड्डी यांनी सांगितले की, "हे मोबाईल फोन आत कसे आले, कोणी दिले, फुटेज कधी आणि कोणी माध्यमांना दिले, याची कसून चौकशी केली जात आहे." प्रशासनाला आतील कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशय आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले, "गृहमंत्री उद्या उच्च-स्तरीय बैठक घेतील. दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री केली जाईल." तसेच, कारागृह प्रशासनाला दोषी कैद्यांवर आणि जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.