Bandana Girl Viral Video
नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कोण रातोरात स्टार बनेल, याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय सध्या एका २ सेकंदाच्या व्हिडिओमुळे येत आहे, ज्यात दिसणारी तरुणी सध्या चर्चेत आहे. गळ्यात बँडना बांधलेली ही तरुणी आता 'बँडना गर्ल' या नावाने प्रसिद्ध झाली असून, तिच्या व्हिडिओने 'एक्स'वर १० कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी ऑटो रिक्षाच्या सीटवर अत्यंत सहजपणे बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ भारतात शूट झाल्याचे दिसत आहे. ती कोणत्याही खास पोज मध्ये नाही तर केवळ सहज बसलेली असताना, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि गळ्यातील आकर्षक बँडनामुळे हा सामान्य क्षण असामान्य ठरला. काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि मीम्सचा वर्षाव सुरू झाला.
२ नोव्हेंबर २०२५ रोजी, तिने एका ऑटोमधून २ सेकंदांचा हा व्हिडिओ पोस्ट केला. कॅप्शनमध्ये लिहिले होते, "आज मेकअप खाल्ला." आणि २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी, २० दिवसांनी व्हिडिओला ८५.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. व्हिडिओ व्हायरल होऊन मोठी चर्चा होत असली तरी, या 'बँडना गर्ल'ची ओळख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तिचे नाव, शिक्षण किंवा व्हिडिओ नेमका कुठे शूट झाला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला 'बँडना गर्ल' हे दिलेले नावच सध्या तिची एकमेव ओळख बनले आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, तिची ओळख प्रियांका म्हणून पटली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या अनपेक्षित प्रसिद्धीमुळे तरुणी उत्साही होण्याऐवजी दडपणाखाली आल्याचे वृत्त आहे.
हा व्हिडिओ ऑनलाइन चर्चेचा आणि ट्रेंडचा केंद्रबिंदू बनला आहे. अनेक मोठ्या ब्रँड्सनी, कंपन्यांनी आणि व्यक्तींनी याचा वापर करून मीम्स, जाहिराती आणि पोस्ट्स तयार केल्या आहेत. पण या ट्रेंडमागील चेहरा मात्र अजूनही अज्ञात आहे, ज्यामुळे इंटरनेटवरील उत्सुकता कायम आहे.