Bachchu Kadu on CJP Protest
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आंदोलन हा देशाचा आत्मा आहे. आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांबाबत केलेले वक्तव्य करायला नको होते, असे म्हणत त्यांना सुनावले. याचवेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेसह विविध क्षेत्रातील सुधारणांसाठी आंदोलनांची गरजही अधोरेखित केली. व्यक्तिगत पातळीवर आंदोलकांच्या काही भूमिका मला पटत नसल्या तरी परीक्षा व्यवस्थित झाल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही अत्यंत आवश्यक बाब आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीत 'पुढारी'शी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. संपूर्ण शिक्षण व्यवस्था सुधारण्याची गरज असून, या व्यवस्थेला कायमस्वरूपी दर्जा आणि स्थैर्य मिळाले पाहिजे. देशात आंदोलनं झाली पाहिजेत. आंदोलनातून मिळणारे यश देश लक्षात ठेवतो मात्र बैठकीत झालेल्या चर्चेतील गोष्टी कोण लक्षात ठेवते? असा सवाल त्यांनी केला.
आजच्या आंदोलकांनी शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आज दिपके यांचे महत्त्व वाढले आहे. त्यांनी या आंदोलनाचा उपयोग व्यवस्था सुधारण्यासाठी केला पाहिजे.”
केंद्रातील सत्तेतील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे महत्त्व वाढले असून एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता आगामी काळात पक्षाला आणखी यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे हे सेवाभाव ठेवून राजकारण करणारे नेते आहेत. राज्याला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती त्यांनी एका शब्दावर केली. शिक्षण व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठीही त्यांचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र राजकारण हे संख्येशिवाय होत नाही. चांगले विचार मजबूत करायचे असतील, तर लोकांना सोबत घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.