Ayushman Bharat Scheme Update: केंद्र सरकारच्या आयुष्मान योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. देशभरात आता ११२ आजारांच्या पॅकेजमध्ये ५ लाखापर्यंतच्या मोफत उपचार किंवा ऑपरेशन फक्त आणि फक्त सरकारी रूग्णालयात करता येणार आहे. १ डिसेंबर पर्यंत ८९ इतर पॅकेज देखील आरक्षित करण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागांना दिशा निर्देश दिले आहेत. मात्र हे पॅकेज खासगी रूग्णालयातून हटवण्याचा अधिकार राज्याचा असेल.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणच्या उप सचिव डॉक्टर शैलेश यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य विभागांना पत्र पाठवलं आहे. यात सार्वजनिक आरोग्य सुविधांचे आरक्षित पॅकेजबाबतीत नवीन यादी एक डिसेंबर २०२६ पासून सीएमएस मध्ये लागू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये ही व्यवस्था पहिल्यापासून काही प्रमाणात लागू केली गेली आहे. आता ही राष्ट्रीय स्तरावर लागू करण्याच्या दृष्टीकोणातून पावले टाकली जात आहेत.
उत्तराखंड राज्य आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या रूग्णालय तसेच जाणकारांची बैठक घेऊन त्यांना याबाबत आपले मत देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांनी रूग्णालयांना या पॅकेजमधून देण्यात येणाऱ्या उपचाराबाबतच्या प्रक्रियेबाबत पूर्ण माहिती मागवली आहे. हे पॅकेज गायनी (स्त्री रोग), जनरल सर्जरी, मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन, अर्थोपेडिक्स, इएनटी आणि नेत्र रोग विभागासंदर्भातील आजारांबाबत आहे.
जाणकारांच्या मते खासगी रूग्णालयातील हे पॅकेज बंद करण्यामागचा उद्येश हा खासगी रूग्णालयात या पॅकेजवर होणार खर्च कमी करणे आणि सरकारी रूग्णालयातील सुविधा अजून मजबूत करून रूग्णांना थेट लाभ पोहचवण्याचा आहे. मात्र सरकारी रूग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर सुविधांची उपलब्धता याचा आढावा घेणे गरजेचे आहे. हा आढावा एसएचए करत आहेत.
या ११२ पॅकेजमध्ये डे केअर उपचार, ऑपरेशन सह अनेक दीर्घ उपचार देखील समाविष्ट आहेत. आता राज्यात कशी स्थिती आहे ते पाहून सरकारी रूग्णालयात या पॅकेज अंतर्गत उपचार देण्याची क्षमता आहे की नाही याची तपासणी केली जाईल.