Ayush Malik Shamli : आपण इस्लाम धर्म स्वीकारला असून आपले नाव बदलून मोहम्मद अली केले आहे, अशी जाहीर घोषणा केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच शामली येथील फार्मास्युटिकल व्यावसायिक देवराज मलिक यांचा मुलगा आयुष मलिक (वय ३०) पुन्हा हिंदू धर्मात परतला आहे. आयुष आपल्या घरात पूजा करत असल्याचा एक व्हिडिओ त्याच्या कुटुंबीयांनी जारी केला आहे.
८ जून रोजी आयुषने इस्लाम धर्मातील केलेला प्रवेश आणि चांदणी कुरेशीसोबतचा विवाह यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणामुळे हिंदू संघटनांचे लक्ष वेधले गेले. उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मपरिवर्तन प्रतिबंधक कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याप्रकरणी चांदणी आणि तिच्या वडिलांना अटक केली. आपल्या मुलाला कुटुंबाची संपत्ती हडपण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून धर्मपरिवर्तनाच्या जाळ्यात ओढण्यात आले, असा आरोप आयुषच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी चांदणी हिच्यासह अन्य आठ संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता.
आयुषने माध्यमांशी बोलताना आपण स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा केला होता. मला बालपणापासूनच इस्लामबद्दल आकर्षण होते. मी सुमारे चार वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केले होते आणि चांदणीशी माझ्या स्वइच्छेने लग्न केले होते.तसेच ते दोघेही सज्ञान असून कायदेशीररित्या स्वतःचे निर्णय घेण्यास पात्र असल्याचेही त्याने म्हटले होते.
आयुष मलिकच्या कुटुंबीयांनी जारी केलल्या व्हिडिओमध्ये आयुष आपल्या आईला उद्देशून एक लिखित विधान वाचताना दिसत आहे. "आई, मी इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि माझा धर्म बदलला होता. पण तुझे आणि आपल्या कुटुंबाचे दुःख पाहून, मी माझ्या स्वइच्छेने पुन्हा आपल्या धर्मात परतलो आहे. मला तुझ्या आणि वडिलांच्या प्रेमाखाली आणि आशीर्वादाखाली जगायचे आहे. कृपया मला माफ कर," असे तो यात म्हणत आहे.
या व्हिडिओमध्ये तो कुटुंबाच्या मंदिरामध्ये पूजा आणि आरती करतानाही दिसत आहे. देवराज मलिक यांनी या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा दिला आहे. "एक वडील म्हणून मी देवाचा अत्यंत आभारी आहे की माझा मुलगा आयुष मलिक याने त्याच्या सनातन मूल्यांशी आणि वैदिक परंपरेची पुन्हा जोडले जाण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी सनातन हा केवळ एक धर्म नसून संस्कृती, मूल्ये आणि अध्यात्मात रुजलेली एक शाश्वत जीवनपद्धती आहे," असे देवराज मलिक म्हणाले.