Champat Rai  Pudhari
राष्ट्रीय

Ram Mandir donation scam: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण: चंपत राय यांचा SIT समोरील गोपनीय जबाब लीक! नक्की काय घडलं?

राम मंदिरातील दानपेटीतील चोऱ्यांच्या प्रकरणाला आता एक नवीन आणि नाट्यमय वळण मिळाले आहे

पुढारी वृत्तसेवा

Ram Mandir donation scam:

अयोध्या : राम मंदिरातील दानपेटीतील चोऱ्यांच्या प्रकरणाला आता एक नवीन आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी नोंदवलेला अत्यंत गोपनीय लिखित जबाब लीक झाला आहे. या लीक झालेल्या जबाबामुळे अयोध्येतील राजकीय आणि धार्मिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चंपत राय यांनी या जबाबात दानपेटीतील रकमेची मोजणी, ती बँकेत जमा करण्याची प्रक्रिया आणि त्यासंबंधीच्या प्रशासकीय निर्णयांवरून स्वतःचे हात झटकले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य अनिल मिश्रा यांच्या भूमिकेकडे संशयाची सुई वळली असून, ट्रस्टच्या अंतर्गत गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

'त्या' कराराशी माझा संबंध नाही; चंपत राय यांचा दावा

लीक झालेल्या कथित जबाबातील माहितीनुसार, चंपत राय यांनी 'एसआयटी'ला स्पष्ट केले आहे की, दानपात्रातून निघालेल्या रक्कमेची मोजणी, तिची सुरक्षा, ती बँकेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आणि बँकेसोबत झालेल्या सामंजस्य कराराशी त्यांचा कोणताही थेट संबंध नव्हता. या करारावर त्यांची स्वाक्षरी देखील नाही. नोटा मोजण्याच्या प्रक्रियेत काय बदल झाले, सुरक्षेत काय फेरबदल करण्यात आले आणि बँक अधिकाऱ्यांसोबत कोणत्या पातळीवर निर्णय घेण्यात आले, याची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती आणि आपण या प्रक्रियेचा भाग नव्हतो, असा दावा राय यांनी केला आहे.

अनिल मिश्रा अडचणीत? ट्रस्टमध्ये मतभेद जाहीर

चंपत राय यांनी ज्या सामंजस्य कराराचा उल्लेख केला आहे, त्यावर अनिल मिश्रा यांची सही असल्याचे समजते. त्यामुळे चंपत राय यांनी तपास यंत्रणेसमोर स्वतःची भूमिका मर्यादित ठेवत सर्व प्रशासकीय जबाबदारी अनिल मिश्रा यांच्यावर ढकलल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, हा जबाब लीक होण्याच्या अवघ्या काही तास आधी चंपत राय यांनी 'एक्स' वर रामभक्तांच्या नावे एक खुले पत्र प्रसिद्ध केले होते. या वादावर त्यांची ही पहिलीच जाहीर प्रतिक्रिया होती. यामध्ये त्यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावत म्हटले की, "मी गेल्या ४१ वर्षांपासून प्रचारक म्हणून जीवन जगत असून १९९१ पासून राम मंदिर आंदोलनाशी जोडलो गेलो आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व आरोपांना पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिले जाईल." चंपत राय यांचे हे पत्र आणि पाठोपाठ लीक झालेला जबाब यामुळे शांत होत चाललेला वाद पुन्हा पेटला असून ट्रस्टच्या नेत्यांमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

अनिल मिश्रांना लवकरच चौकशीचे समन्स?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एसआयटी'च्या प्राथमिक अहवालातही अनिल मिश्रा यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांना नोटीस पाठवण्यात आली असून लवकरच त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अयोध्या पोलीस अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी करत असून या चोरीचे संपूर्ण नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT