Axiom-4 mission | भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह अन्य तिघांना घेवून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेपावणार्या अॅक्सिओम-४ या अंतराळयानाचे प्रक्षेपण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. आता या मोहिमेचे प्रक्षेपणाच्या नव्या तारखेसंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने माहिती दिली आहे.
'इस्रो'च्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'अॅक्सिऑम-4' मोहिमेच्या सुधारित प्रक्षेपण तारीख अॅक्सिऑम स्पेस, नासा, स्पेसएक्स आणि भारत, पोलंड व हंगेरीतील तांत्रिक संस्थांमधील सखोल चर्चेनंतर निश्चित करण्यात आली आहे. तसेच प्रक्षेपण मार्गावरील हवामान स्थितींचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ प्रक्षेपकाची तत्परता, ‘ड्रॅगन’ अंतराळयानाची कार्यक्षमता, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील झ्वेझ्दा मॉड्यूलमधील दुरुस्ती, प्रक्षेपण मार्गातील हवामान स्थिती तसेच क्वारंटाइनमधील अंतराळवीरांच्या प्रकृती व सज्जतेच्या स्थितीच्या आधारे, अॅक्सिऑम स्पेसने २२ जून २०२५ ही पुढील संभाव्य प्रक्षेपण तारीख असल्याचे कळवले आहे," असे इस्रोने स्पष्ट केले आहे.
अॅक्सिओम 4 मोहिमेत भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरी या देशांचे प्रत्येकी एक अंतराळवीराचा समावेश आहे. या मोहिमेच्या कमांडर आहेत अंतराळवीर पेगी व्हिट्सन. त्यांनी आतापर्यंत एकूण ६७५ दिवस अंतराळात घालवले असून, ही महिला अंतराळवीरांच्या नावावर एक विक्रमी नोंद ठरली आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत भारत लवकरच एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. भारताचे शुभांशू शुक्ला आता अंतराळात जाणारे दुसरे भारतीय बनणार आहेत. इतकेच नाही तर ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे पहिले भारतीय असतील. हे अभियान अमेरिकेची अंतराळ मोहीम कंपनी अॅक्सिओम स्पेस आणि नासा यांच्या सहकार्याने राबवले जात आहे. तसेच, एलोन मस्कचे स्पेसएक्स या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावेल.
यापूर्वी 'स्पेसएक्स'ने एक्स पोस्टमध्ये म्टहलं होते की, फाल्कन ९ च्या एक्स-४ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे (ISS) झेपावणार होते. मात्र ही मोहिम पुढे ढकलण्यात येत आहे. पोस्ट स्टॅटिक फायर बूस्टरच्या तपासणीदरम्यान आढळून आलेल्या ऑक्सिजन गळतीची समस्या आढळून आली आहे. गळतीची दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळघवा म्हणून प्रेक्षपण पुढे ढकलण्यात आले आहे. आता दुरुस्तीनंतर, आम्ही लवकरच नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर करू, असेही 'स्पेसएक्स'ने स्पष्ट केले आहे. यापूर्वी अॅक्सिओम-४ या अंतराळयानाचे प्रक्षेपण रविवार, ८ जून रोजी होणार होते. मात्र विविध कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण १० जून ऐवजी ११ जून २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले होती. मात्र ऑक्सिजन गळतीची समस्येमुळे ही मोहिम स्थगित करण्यात आली होती.