Crime News
गुवाहाटी: एका नराधम बापाने धावत्या ट्रेनमध्ये आपल्या अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरडीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी संशयीत आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
सुनील मुर्मू असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. तर सुमी (वय ६) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'डेकारगाव-मुरकोंगसेलेक एक्स्प्रेस'च्या जनरल डब्यातून सुनील हा आपल्या मुलीसह प्रवास करत होता. विश्वनाथ चरियाली शहरामध्ये ते रेल्वेत चढले होते. डब्यात प्रवाशांची संख्या कमी होती. सुनीलकडे एक धारदार कोयता होता आणि तो सुरुवातीपासूनच डब्यात गोंधळ घालत होता. त्याच्या विचित्र वागण्यामुळे घाबरलेले इतर प्रवासी दुसऱ्या डब्यात निघून गेले. याच संधीचा फायदा घेत सुनीलने आपल्या मुलीवर कोयत्याने वार करून तिचे शिर धडावेगळे केले.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिलोनीबारी रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचण्यापूर्वी काही मिनिटे आधी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले. या भयानक प्रकारानंतर प्रवाशांचे जबाब नोंदवून सकाळी १०:५८ वाजता रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
आरोपी सुनील मुर्मू आणि त्याची मुलगी आसामच्या धेमाजी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी 'भारतीय न्याय संहिता' (BNS) कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. "आरोपीची चौकशी सुरू आहे, मात्र त्याने पोटच्या मुलीची इतक्या निर्घृणपणे हत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही," असे पोलिसांनी सांगितले.