नवी दिल्ली : आषाढी एकादशीनिमित्त राजधानीत आयोजित सांकेतिक वारीत हजारो दिल्लीकर मराठी बांधत न्हाऊन निघाले. दिल्लीतील रस्ते विठुरायाच्या नामस्मरणात भक्तीरसात दंग होवून, भर पावसात 'भेटीलागीं जीवा लागलीसे आस'चे पुन्हा एकदा साक्षीदार ठरले. पारंपारिक वेशभूषा, फुगड्या घालत विठ्ठलाच्या भक्तीभावात तल्लीन होऊन ही वारी आर.के.पुरम येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दिशेने निघाली. पहाटे ६ वाजता बाबा खडकसिंह मार्गावरील हनुमान मंदिर येथून ही वारी सुरू झाली.
डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, कपाळी टिळा लावलेल्या असंख्य भाविकांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. 'जय जय रामकृष्ण हरी' नामाचा गजर करीत वारीनिमित्त पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भक्तीच्या महारसात, १५ किलोमीटरची वारी करीत वैष्णवांचा हा मेळा दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. वारीमध्ये खासदार धैर्यशील पाटील, खासदार मनोज तिवारी, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, इंदिरा गांधी कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, केंद्र शासनाच्या विविध विभागात असणारे मराठी अधिकारी या वारीत सहभागी झालेत. रामकृष्ण पुरम असे मार्गक्रमण करीत वारीची सांगता झाली. यावेळी आर के पुरम येथील विठ्ठल मंदिरात महापूजा संपन्न झाली.
महाराष्ट्र संस्कृतीच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या वारी परंपरेत मागील ५ वर्षांपासून दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी होतात. साधारण ८ ते ९ दिवसात आळंदी ते पंढरपूरपर्यंतची मार्गक्रमण पूर्ण करून विठ्ठलाचा आशीर्वाद समस्त दिल्लीकर बांधवांसाठी घेऊन येतात. याही वर्षी हे वारकरी विठ्ठल दर्शन घेऊन दिल्लीतील या सांकेतिक वारीत सर्वांसमवेत सहभागी झाले होते, अशी माहिती दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दिली.
देशाच्या राजधानीत शिस्तबद्ध पद्धतीने निघणारी सांकेतिक वारी दिल्लीकरांसाठी ही आकर्षणाचे केंद्र ठरले. नवी दिल्लीतील प्रमुख भागांमधून जाणारी आणि सुमारे एक ते दीड हजार लोकांचा समावेश असलेली ही वारी अतिशय शांततेने आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता पार पडते. त्याचप्रमाणे वारी मार्गावर सहभागी भाविकांना पाणी, लिंबूपाणी, फळे इत्यादींचे वाटप करण्यात येते. असे असतानाही संपूर्ण वारी मार्ग हा स्वच्छ असतो. वारीतील या शिस्तीचे दिल्लीच्या पोलीस प्रशासनाने ही कौतुक केले आहे.
महाराष्ट्र आणि भजनी मंडळ ही एक विशेष परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील अगदी लहानातल्या लहान गावातही एखाद्या तरी भजनी मंडळ असतेच. महाराष्ट्रातील हीच परंपरा आता दिल्लीतही सुरू झाली आहे. यंदाच्या सांकेतिक वारीमध्ये एक नव्हे तर तीन भजनी मंडळे सहभागी झाली होती. यंदाच्या वर्षीचे एक भजनी मंडळ म्हणजे १६ वर्षाखालील मराठी तरुण मुलांचे होते. एक भजनी मंडळ महिलांचे होते तर अन्य एक भजनी मंडळ तर दिल्लीतील मराठी तरुणांचे होते. सांकेतिक वारीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी या भजनी मंडळाच्या सुरेल भजनांचाही आस्वाद घेतला.