Delhi CM Rekha Gupta on Ashadhi Ekadashi
नवी दिल्ली : आषाढी एकादशीचा उत्साह महाराष्ट्रात सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. असाच उत्साह राजधानी दिल्लीतही आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत रविवारी (६ जुलै) सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या या वारीत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आषाढी वारी असते त्याचप्रमाणे दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सांकेतिक वारीचे आयोजन दरवर्षी केले जाते. टाळ - मृदंगाचा गजर करत, फुगड्या घालत विठ्ठल रखुमाईच्या भक्तीचा गजर करत दरवर्षी दिल्लीकर मराठी बांधव या वारीचे आयोजन करत असतात. या वारीच्या निमित्ताने अनेक शतकांचा वैभवशाली इतिहास असलेल्या पंढरपूरच्या वारीचे दर्शन दिल्लीकरांना होते.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरापासून आर. के. पुरम परिसरातील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत जवळपास १२ किलोमीटर वारीचा मार्ग असतो. दरवर्षी हजारो दिल्लीकर मराठी नागरिक यामध्ये सहभागी होत असतात. अधिकाधिक नागरीकांनी वारीत सहभागी होण्याचे आवाहन दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.