पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला आहे. न्यायालयाने या निर्णयासाठी ५ जूनची तारीख निश्चित (Arvind Kejriwal) केली आहे. या संदर्भातील वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
केजरीवाल यांच्या जामिन याचिकेवर आज दिल्ली सत्र न्यायालयात सुनावणी झाली. राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी 5 जून रोजी आदेश सुनावला जाणार असल्याची माहिती दिली.
यावेळी ईडीने म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रचार करत आहेत. त्यांनी वैद्यकीय चाचणी देखील केलेली नाही आणि आत्मसमर्पण करताना ते वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मागत आहेत. चाचण्यांना उशीर करून त्याला न्यायालयाची फसवणूक करायची आहे, असा युक्तीवाद ईडीचे वकील एसव्ही राजू यांनी केला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील अरविंद केजरीवाल यांची ज्येष्ठ वकील एन हरिहरन यांनी बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले, केजरीवालांचा अंतरिम जामीन हा पक्षाच्या प्रचाराच्या उद्देशाने होता जो राष्ट्रीय पक्ष आहे. ते २० दिवसांसाठी बाहेर होते. दरम्यानच्या काळात जर ज्यासाठी जामीन मिळाला त्याचा वापर केला नाही तर तुम्हीच म्हणाल की, पहा! त्यांनी प्रचार केला नाही आणि आजारी पडले, असा युक्तिवाद केजरीवलांच्या वकीलांना दिल्ली सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान केला.
केजरीवाल यांनी ट्रायल कोर्टासमोर दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत नियमित जामीन मिळावा, तर दुसऱ्याने वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला आहे. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत (आज) अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याला 2 जूनपर्यंत आत्मसमर्पण करायचे आहे.
हेही वाचा: