Jammu Kashmir File Photo
राष्ट्रीय

Jammu Kashmir: जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, अमरनाथ यात्रा स्थगित...; कलम ३७० रद्द करण्याच्या घटनेस ७ वर्षे पूर्ण

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या सातव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खोऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jammu Kashmir Article 370 removal anniversary

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या सातव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खोऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बुधवारी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पवरून अमरनाथ यात्रा स्थगित केली असून, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही रोखण्यात आली आहे.

आज सकाळी जम्मूमधून पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांच्या नवीन तुकडीला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुरक्षा दलांच्या ताफ्यांची वाहतूकही बंद ठेवली आहे. संपूर्ण देशाला काश्मीरशी जोडणाऱ्या या एकमेव महामार्गावर संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि रहदारी नियंत्रित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कलम ३७० रद्द करणाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त खोऱ्यात राजकीय वातावरण तापले आहे. 'पीडीपी', 'नॅशनल कॉन्फरन्स' आणि 'काँग्रेस' या प्रमुख राजकीय पक्षांकडून आज राज्यभरात निदर्शने केली जात आहेत. मंगळवारी संध्याकाळी 'पीडीपी' अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगरमध्ये कार्यकर्त्यांसह कॅन्डल मार्च काढत निषेध नोंदवला होता.

संभाव्य दहशतवादी कारवाया आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने रामबन आणि कुलगाम भागात NH-४४ वर वाहनांची कसून तपासणी आणि ओळखपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. सीमेवरील भागातही अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. तसेच जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी या ऐतिहासिक निर्णयाचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT