Army Agniveer Recruitment
नवी दिल्ली: भारतीय सैन्य दलात सध्या सुमारे १.८ लाख सैनिकांची मोठी कमतरता आहे. ही कमतरता तातडीने भरून काढण्यासाठी केंद्र सरकार अग्निवीरांची भरती वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या अग्निवीरांसाठी वार्षिक ४५,००० ते ५०,००० इतकी असलेली रिक्त पदांची संख्या वाढवून ती दरवर्षी १ लाखांहून अधिक करण्याचा विचार उच्च स्तरावर सुरू आहे.
अतिरिक्त रिक्त पदे जाहीर करताना, सर्व रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रांच्या सद्यस्थितीतील पायाभूत सुविधांचा आणि क्षमतेचा विचार केला जाईल. प्रशिक्षण आणि शारीरिक मानकांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
'द इंडियन एक्सप्रेस'ला मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षापासून अग्निवीरांसाठी अतिरिक्त रिक्त जागा भरण्याचा विचार लष्कर करत आहे, ज्याची संख्या दरवर्षी अंदाजे १ लाख इतकी आहे, कारण सैनिक निवृत्त होण्याबरोबरच डिसेंबर २०२६ नंतर अग्निवीरांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे.
कोविड महामारीच्या काळात (२०२० आणि २०२१) भरती प्रक्रिया थांबवल्याने सैन्यदलातील मनुष्यबळात कमतरता निर्माण झाली आहे. या दोन वर्षांत भरती प्रक्रिया थांबली असताना, दरवर्षी सुमारे ६०,००० ते ६५,००० सैनिक नियमितपणे सेवानिवृत्त होत राहिले.
२०२२ मध्ये 'अग्निपथ' योजना सुरू होण्यापूर्वी, सैनिकांची भरती सामान्य पद्धतीने केली जात असे. १४ जून २०२२ रोजी ही योजना सुरू झाल्यावर, जवान केवळ चार वर्षांसाठी भरले जाणार होते. २०२२ मध्ये सैन्य, नौदल आणि हवाई दलासाठी एकूण ४६,००० जागा निश्चित करण्यात आल्या होत्या, ज्यात सैन्यासाठी ४०,००० जागा होत्या.
सेवानिवृत्त होणाऱ्यांच्या तुलनेत भरती कमी
योजनेनुसार, पुढील चार वर्षांत सैन्यातील अग्निवीरांची संख्या १.७५ लाख आणि नौदल व हवाई दलातील संख्या २८,७०० पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, २०२२ मध्ये मर्यादित संख्येत भरती सुरू होऊनही, दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या ६०,०००-६५,००० सैनिकांच्या तुलनेत भरतीची संख्या खूपच कमी राहिली. या तफावतीमुळेच दरवर्षी सैनिकांच्या एकूण संख्येत २०,००० ते २५,००० ने घट होत राहिली. परिणामी, आज सैन्यात एकूण १.८ लाख सैनिकांची कमतरता निर्माण झाली आहे.