Apple iphone Pudhari
राष्ट्रीय

Apple China strategy | चीनमुळे भारतातील आयफोन उत्पादन धोक्यात; फॉक्सकॉनमधून 300 चिनी अभियंत्यांची अचानक एक्झिट...

Apple China strategy | मास्टरमाईंड्सना घरी पाठवून चीनचा ‘मेक इन इंडिया’ ड्रीमवर सर्जिकल स्ट्राईक, फॉक्सकॉनमधून ‘स्किल्ड वॉर’ सुरू?

Akshay Nirmale

Apple China strategy Foxconn India iPhone 17 production Chinese engineers withdrawal Apple supply chain disruption

नवी दिल्ली : भारतातील तंत्रज्ञान निर्मितीत मोठे पाऊल टाकण्यासाठी सज्ज असलेल्या अ‍ॅपलच्या ‘iPhone 17’ उत्पादन योजनेला मोठा धक्का बसला आहे. फॉक्सकॉन ही कंपनी भारतात आयफोनचे उत्पादन करते.

तथापि, फॉक्सकॉनच्या भारतातील उत्पादन प्रकल्पांतून 300 हून अधिक चिनी अभियंते व तंत्रज्ञ अचानकपणे माघारी गेले असून, यामुळे आयफोन उत्पादनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

फॉक्सकॉन आणि अ‍ॅपलकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य न आल्याने ही घडामोड अधिकच संशयास्पद ठरली आहे.

विशेष म्हणजे, भारतात प्रगत स्मार्टफोन उत्पादनासाठी चिनी कर्मचाऱ्यांचा अनुभव व प्रशिक्षण कौशल्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. त्यामुळेच ही घडामोड म्हणजे चीनचे शांतपणे भारतावर केलेला सर्जिकल स्ट्राईक मानला जात आहे.

चीनचा ‘सॉफ्ट स्ट्रॅटेजिक’ डाव

संपूर्ण जग ‘चायना प्लस वन’ धोरणाकडे झुकत असताना चीनने आता आपल्या कौशल्यवान कामगारांची ‘निर्यात’ रोखण्याची अनौपचारिक मोहीम सुरु केली आहे.

चिनी सरकारकडूनच सामान्य निर्यातीतून उपकरणे, प्रक्रिया ज्ञान आणि कुशल मनुष्यबळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तातून समोर आले आहे.

या धोरणाचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होतोय, जे अलीकडच्या काळात अ‍ॅपलसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी चीनचा पर्याय म्हणून उभे राहत आहेत.

फॉक्सकॉन समोर आव्हान

फॉक्सकॉनने मागील चार वर्षांत भारतात उत्पादनाचा विस्तार केला. 2024 मध्येच भारतातून 10 अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीचे आयफोन तयार झाले, त्यातील 7 अब्ज डॉलरचे आयफोन युएसला निर्यात झाले. म्हणजे भारत आता अ‍ॅपलसाठी दुसरा ‘हाय-एंड प्रॉडक्शन हब’ बनण्याच्या मार्गावर होता.

पण आयफोन 17 हे उत्पादनाचे मोठे टप्पे गाठण्यासाठी नियोजित मॉडेल असून, यासाठी सुसज्ज ट्रेनिंग व उच्च दर्जाच्या गुणवत्ता प्रक्रियेची गरज होती. जी क्षमता सध्या चिनी अभियंत्यांमुळेच साध्य झाली होती.

चिनी अभियंत्यांच्या अनुपस्थितीमुळे काय होईल?

चिनी अभियंते हे फक्त फोन असेंबल करत नव्हते, तर त्यांनी भारतातील कर्मचाऱ्यांना ‘शेन्झेन स्टँडर्ड’प्रमाणे प्रशिक्षण देणे, गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे आणि उत्पादन कार्यक्षमतेत वाढ घडवणे अशी अनेक महत्त्वाचे कामे केली.

त्यांच्या अनुपस्थितीत, भारतीय कर्मचाऱ्यांना केवळ प्रशिक्षणावर अवलंबून राहावे लागेल. अचूकता, वेळेवर वितरण आणि उत्पादन क्षमतेत यामुळे निश्चितच अडचणी निर्माण होऊ शकतात.

चीनचा बदललेला दृष्टिकोन

भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने ज्या काही उपाययोजना केल्या (उदा. टिक-टॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्स बंद करणे), त्या मुख्यतः प्रतिकात्मक होत्या. पण चीनने मात्र आता उत्पादन पातळीवर गती रोखण्याची रणनीती अंगीकारली आहे.

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन स्वप्नाला खऱ्या अर्थाने धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केवळ चिनी अ‍ॅप्सवर बंदी लावण्याइतकाच सखोल नाही, तर तो या ‘मूक युद्धा’चा एक नवीन टप्पा आहे.

जागतिक पुरवठा साखळीत भारताची भूमिका धोक्यात?

अ‍ॅपलने अमेरिका-चीन व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गुंतवणूक वाढवली. 2026 पर्यंत बहुतेक आयफोन भारतात तयार करायचे अ‍ॅपलचे लक्ष्य आहे. पण चीनने अशा प्रकारे मागचे दार बंद करणे हे भारतासाठी तसेच अ‍ॅपलसाठीही धोका वाढवणारे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेतील अनेक नेत्यांचा अ‍ॅपलवर दबाव आहे की उत्पादन अमेरिकेत हलवावे. पण तेथे लागणारी प्रचंड मजुरी आणि उत्पादन संरचना नसल्यामुळे, अ‍ॅपलने तो मार्ग टाळला आहे.

पुढे काय?

चिनी अभियंत्यांच्या माघारीचे परिणाम सध्या थेट दिसत नसले तरी, आयफोन 17 च्या उत्पादन आणि लॉंच टाईमलाईनमध्ये अडथळा येऊ शकतो. भारत सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे, परंतु अधिकृत कारणे अजूनही चीनने दिली नाहीत.

भारतासाठी ही एक महत्त्वाची कसोटीची वेळ आहे. देशाला जर खरोखरच ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनायचे असेल, तर स्वतंत्र कौशल्य विकास, स्थानिक प्रशिक्षण केंद्रे आणि तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता हाच एक दीर्घकालीन उपाय ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT