Apple iPhone price File Photo
राष्ट्रीय

Apple iPhone price: भारतात आयफोन महागले; आयफोन १७ ची सुरुवात ९९,९०० रुपये, तर १८ प्रो मॉडेल्सच्या किमतीत २२% वाढ

ॲपलने भारतातील आपल्या iPhone मॉडेल्सच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. नव्याने लाँच झालेल्या iPhone 17 ची सुरुवातीची किंमत आता 99,900 रुपये झाली आहे.

मोहन कारंडे

Apple iPhone price:

नवी दिल्ली : ॲपलने भारतातील आपल्या iPhone मॉडेल्सच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. नव्याने लाँच झालेल्या iPhone 17 ची सुरुवातीची किंमत आता 99,900 रुपये झाली आहे. यापूर्वी हा फोन 82,900 रुपयांना उपलब्ध होता. विशेष म्हणजे, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max यांच्या किमती त्यांच्या आधीच्या iPhone 17 Pro मॉडेल्सपेक्षा तब्बल 20 ते 22 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचबरोबर ॲपलने फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाजारातही प्रवेश केला असून, iPhone Duo ची सुरुवातीची किंमत 2,99,900 रुपये आहे.

iPhone 17 ची किंमत 17 हजारांनी वाढली

iPhone 17 च्या 256GB मॉडेलची किंमत आता 99,900 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 82,900 रुपये होती. म्हणजेच किंमतीत 17,000 रुपये किंवा 20.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 512GB मॉडेलची किंमत 1,24,900 रुपये करण्यात आली असून, ती आधीच्या 1,02,900 रुपयांच्या तुलनेत 22,000 रुपये किंवा 21.4 टक्क्यांनी अधिक आहे.

Pro मॉडेल्सही महाग

iPhone 18 Pro ची सुरुवातीची किंमत 1,64,900 रुपये आहे. iPhone 17 Pro ची किंमत 1,34,900 रुपये होती. त्यामुळे नव्या मॉडेलच्या किमतीत 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. iPhone 18 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,79,900 रुपये आहे. iPhone 17 Pro Max ची किंमत 1,49,900 रुपये होती. या मॉडेलच्या किमतीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेसह इतर प्रमुख बाजारपेठांच्या तुलनेत भारतातील ही दरवाढ लक्षणीयरीत्या जास्त आहे.

किमती वाढण्याचे कारण काय?

Counterpoint Research चे रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक यांच्या मते, भारतातील iPhoneच्या किमतीतील वाढ ही जागतिक पातळीवरील सरासरी वाढीपेक्षा खूपच जास्त आहे. “जागतिक बाजारात iPhoneच्या किमतीत सरासरी 8 ते 10 टक्के वाढ झाली आहे. मात्र भारतात ही वाढ 20 ते 30 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे,” असे पाठक यांनी सांगितले.

मेमरीच्या वाढलेल्या किमतीबरोबरच रुपयाची झालेली घसरण आणि देशांतर्गत उत्पादन खर्चातील वाढ यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच iPhone Duo ची भारतात स्थानिक पातळीवर असेंब्ली होत नसल्याने त्यावर 20 टक्के आयात शुल्क लागू होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. किमतीतील अपेक्षेपेक्षा मोठ्या वाढीचा आगामी सणासुदीच्या काळातील ग्राहकांच्या खरेदीवरही परिणाम होऊ शकतो, असे पाठक यांनी म्हटले आहे.

iPhone 18 Pro ची स्टोरेजनुसार किंमत

256GB : 1,64,900 रुपये

512GB : 1,89,900 रुपये

1TB : 2,39,900 रुपये

2TB : 3,14,900 रुपये

आयफोन १८ प्रो मॅक्स'ची किंमत

256GB : 1,79,900 रुपये

512GB : 2,04,900 रुपये

1TB : 2,54,900 रुपये

2TB : 3,29,900 रुपये

Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhoneची किंमत किती?

256GB : 2,99,900 रुपये

512GB : 3,24,900 रुपये

1TB : 3,74,900 रुपये

2TB : 4,49,900 रुपये

iPhone Air सर्वाधिक महागला

नव्याने सादर करण्यात आलेल्या iPhone Air च्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. 256GB मॉडेलची किंमत आता 1,49,900 रुपये झाली आहे. यापूर्वी हा फोन 1,19,900 रुपयांना मिळत होता. म्हणजेच 30,000 रुपये किंवा 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. 512GB मॉडेलची किंमत 1,39,900 रुपयांवरून 1,74,900 रुपये झाली आहे. यात 35,000 रुपये म्हणजेच 25 टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक दरवाढ 1TB iPhone Air मध्ये झाली आहे. त्याची किंमत 1,59,900 रुपयांवरून थेट 2,24,900 रुपये झाली आहे. म्हणजेच 65,000 रुपये किंवा 40.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

iPhone 17e आणि iPhone 16ही महाग

iPhone 17e च्या 256GB मॉडेलची किंमत आता 79,900 रुपये आहे. पूर्वी ती 64,900 रुपये होती. त्यामुळे 15,000 रुपये म्हणजेच 23.1 टक्के वाढ झाली आहे. 512GB मॉडेलची किंमत 84,900 रुपयांवरून 1,04,900 रुपये झाली आहे. यात 20,000 रुपये म्हणजेच 23.6 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, iPhone 16 च्या 128GB मॉडेलची किंमत 69,900 रुपयांवरून 89,900 रुपये झाली आहे. म्हणजेच या मॉडेलच्या किमतीत 20,000 रुपये किंवा 28.6 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT