IPS Officer Death Case : हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी पूरन कुमार यांच्या मृत्यू प्रकरणाला आज धक्कादायक वळण मिळघले. रोहतकमधील सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या हरियाणा पोलिसातील एका कर्मचाऱ्याने मंगळवारी जीवन संपवले. मृत्यूपूर्वी त्यांनी एक तीन पानांची चिठ्ठी आणि व्हिडिओमध्ये आयपीएस पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
हरियाणातील सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) संदीप कुमार यांचा मृतदेह रोहतक-पानिपत रस्त्याजवळील एका विहिरीजवळ (tubewell) आढळून आला. पोलिसांनी आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेला आत्महत्या संदेश (Suicide Note) आणि व्हिडिओ तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.
संदीप कुमार यांनी त्यांच्या चिठ्ठीत ७ ऑक्टोबर रोजी चंदीगड येथे आत्महत्या केलेल्या आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चिठ्ठीत म्हटले आहे की, "वाय पूरन कुमार एक भ्रष्ट अधिकारी होते. त्यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत. सध्या सुरू असलेल्या तपासामुळे अटकेची भीती वाटत असल्याने, आपण मरण्यापूर्वी 'भ्रष्ट व्यवस्थेचा' पर्दाफाश करू इच्छितो, असेही त्यांनी आपल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. "निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी मी माझ्या जीवनाचा त्याग करत आहे. या भ्रष्ट कुटुंबाला सोडले जाऊ नये," असे चिठ्ठीत नमूद आहे. जबाबदारीपासून स्वतःला वाचवण्यासाठी IPS पूरन कुमार यांनी जातीय राजकारण वापरून 'व्यवस्था हायजॅक' केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ASI संदीप कुमार हे आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्या अंगरक्षक सुशील कुमार यांच्याशी संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमचा भाग होते, मात्र ते तपास अधिकारी नव्हते.संदीप कुमार यांच्या मृत्यूनंतर, त्यांची मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारतानाची छायाचित्रं व्हायरल झाली आहेत.
काही दिवसांपूर्वी हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी जीवन संपवले होते. ते चंदीगडमधील सेक्टर ११ येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते. सन २००१ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले आणि रोहतकच्या सुनारिया येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महानिरीक्षक (IG) म्हणून कार्यरत होते. कुमार यांनी खुर्चीवर बसून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.या घटनेच्या वेळी त्यांची पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पूरन कुमार, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह अधिकृत दौऱ्यावर जपानमध्ये होत्या.
पूरन कुमार यांच्या खिशातून सविस्तर नऊ पानांची आत्महत्या चिठ्ठी जप्त करण्यात आली होती, ज्यात त्यांनी १२ ते १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतली होती. यापैकी ७-८ आयपीएस आणि २ आयएएस अधिकारी होते. त्यांनी या अधिकाऱ्यांवर छळ, जाती-आधारित भेदभाव करण्याचा आरोप केला होता. चिठ्ठीचे एक पान 'मृत्युपत्र' म्हणूनही होते, ज्यात त्यांनी आपली सर्व मालमत्ता पत्नीच्या नावावर केली होती.या चिठ्ठीत कुमार यांनी डीजीपी शत्रुजीत कपूर यांच्यावर छळाच्या विशिष्ट घटनांचा आरोप केला आहे. आपल्या शेवटच्या ओळीत कुमार यांनी लिहिले होते, "पुरेशा वेळेची वाट पाहिल्यानंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, माझ्यासमोर हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याशिवाय पर्याय उरला नाही. माझ्याबद्दलचा हा द्वेष आता माझ्यासोबत संपेल अशी आशा आणि प्रार्थना आहे."
पूरन कुमार यांच्या पत्नीने डीजीपी शत्रुजीत सिंग कपूर आणि तत्कालीन रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारणिया यांच्यावर पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची औपचारिक तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला, "माझ्या पतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दीर्घकाळ मानसिक छळ आणि जाती-आधारित अपमानाला सामोसाने जावे लागले. हरियाणाचे डीजीपी आणि रोहतकच्या एसपी यांच्या कृतीमुळेच त्यांचा मृत्यू झाला." या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलमांखाली १३ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर नरेंद्र बिजारणिया यांना रोहतक एसपी पदावरून हटवण्यात आले आणि सुरेंद्र सिंह भोरिया यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.चंदीगड पोलिसांनी आयजी पुष्पेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार यांनी जीवन संपवले असून त्यांनी केलेले आरोप पूरन कुमार यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासाला गुंतागुंतीचे करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.