भाजप महाराष्ट्रातही राबविणार 'हरियाणा पॅटर्न'

Maharashtra assembly elections 2024 | ओबीसींसह अन्य जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेणार
Maharashtra assembly elections 2024
भाजप महाराष्ट्रातही राबविणार 'हरियाणा पॅटर्न'file photo
Published on
Updated on

नाशिक : 'एक्झिट पोल'चे अंदाज खोटे ठरवत भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत हॅट‌्ट्रिक साधली. विपरीत परिस्थितीतही सामाजिक आणि राजकीय समीकरणाबरोबर जातीय समीकरणांचा सुयोग्य वापर करत भाजपने या निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड दिली. निवडणूक विजयाचा 'हरियाणा पॅटर्न' आता महाराष्ट्रातही राबविण्याची तयारी भाजपने केली आहे. आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात मराठा समाज काही प्रमाणात महायुतीच्या विरोधात दिसत असला तरी 'ओबीसीं'सह अन्य समाजांची मोट बांधून निवडणुकीचे रण पेटवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अलीकडच्या काळात विविध समाजांसाठी १२ महामंडळांची करण्यात आलेली स्थापना भाजपच्या 'हरियाणा पॅटर्न'ची प्रचिती देणारी निश्चितच आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक राज्यातील महायुतीसाठी जशी प्रतिष्ठेची आहे, तशीच ती विरोधी महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचीदेखील आहे. त्यामुळेच या दोन्हींकडून जोरदार तयारी सुरू आहे. हरियाणातील विजय भाजपसाठी चैतन्य निर्माण करणारा ठरला असून महाराष्ट्रातही विजयासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक इशारा दिला आहे. महाराष्ट्राची निवडणूक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हाती घेतल्यामुळे हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही राबविला जाणार, याची कुणकुण सर्वांनाच लागली होती. हरियाणाचा विजय हा आमच्यासाठी रोडमॅप असेल, त्यामुळे राज्यातही चांगले यश मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यातील महायुती सरकारकडून अलीकडे घेतले गेलेले निर्णय, योजना आणि ओबीसी समाजासह अन्य छोट्या समाजांना, त्यांचे नेतृत्व करणाऱ्या पक्षांना विविध महामंडळांच्या माध्यमातून चुचकारण्याचा प्रयत्न हरियाणा पॅटर्नची प्रचिती देणारा आहे. लोकसभेतील अपयशानंतर भाजपने हरियाणात २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मोठे यश मिळवले आहे. जाटबहुल हरियाणात ओबीसी, दलित यांना जवळ करत यशाचा मार्ग शोधला. त्याच धर्तीवर राज्यातही चमत्कार घडविण्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

महाराष्ट्रात अशी असेल रणनीती

लोकसभेला महायुतीला किंबहुना भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर मराठा समाज महायुतीवर काहीसा नाराज दिसत आहे. त्यामुळे हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याचबरोबर अन्य समाजातील लोकांना, त्यांचे नेतृत्व करणाऱ्या छोट्या पक्षांनादेखील जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच विविध समाजांसाठी १२ महामंडळांची स्थापना हा एक निवडणूक व्यूहरचनेचाच भाग म्हणावा लागेल. लोकसभेला दलित, मुस्लीम मतांची ताकद भाजपला धक्का देणारी ठरली. त्यामुळेच या समाजाच्या मतांकडेही भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. बूथरचनेवर लक्ष केंद्रित करताना दलित आणि मुस्लीम मतदारसंख्या अधिक असलेल्या बूथवर पालक कार्यकर्ते नेमण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजातील काही मते विरोधात गेली तरी ओबीसी आणि अन्य जातींचे समीकरण मांडून विजय मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news