BJP Tamil Nadu president Annamalai resignation
नवी दिल्ली : तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी मंगळवारी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेऊन आपला ५ पानांचा राजीनामा सुपूर्द केला. अन्नामलाई यांच्या राजकीय भविष्याबाबत सुरू असलेल्या जोरदार चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे.
माजी आयपीएस अधिकारी असलेले अन्नामलाई 'धर्मनिरपेक्ष' आणि 'तमिळ-प्रथम' विचारसरणी असलेला एक नवीन प्रादेशिक राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या ६ ते ८ महिन्यांत या नवीन पक्षाची घोषणा होऊ शकते. हा पक्ष तमिळनाडूमध्ये भाजप आणि द्रमुक-अण्णाद्रमुक यांसारख्या प्रमुख द्राविडी पक्षांना एक सक्षम पर्याय म्हणून समोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.अन्नामलाई यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक असे राजकीय व्यासपीठ उभे करायचे आहे जे तमिळ अस्मिता आणि राष्ट्रीय दृष्टिकोन यांचा मेळ घालेल, तसेच विरोधी पक्षांना केवळ मुद्द्यांच्या आधारे विरोध करेल.
तमिळनाडूतील भाजपच्या राजकीय रणनीतीवरून गेल्या काही महिन्यांपासून अन्नामलाई आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात मतभेद सुरू होते, त्यातूनच हा निर्णय घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अण्णाद्रमुक (AIADMK) सोबत पुन्हा युती करण्याचा भाजपचा निर्णय आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निवडीबाबत अन्नामलाई नाराज असल्याचेही बोलले जात आहे. भाजपने कोणत्याही युतीवर अवलंबून न राहता राज्यात स्वतःची स्वतंत्र संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला पाहिजे, अशी भूमिका अन्नामलाई यांनी मांडली होती. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने द्रमुकविरोधी (anti-DMK) रणनीतीला अधिक प्राधान्य दिल्याचे समजते.
अभिनेत्याकडून राजकारणी बनलेले 'विजय' यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आणि त्यांच्या पक्षाच्या कामगिरीमुळे तमिळनाडूचे राजकीय चित्र बदलले आहे. आता नव्या राजकीय पक्षांसाठी जागा निर्माण झाली आहे, असा दावा अन्नामलाई यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. अनेक तरुण व्यावसायिक आणि नवोदित राजकारणी सध्याच्या राजकीय पक्षांवर नाराज असून, ते या नव्या व्यासपीठाकडे आकर्षित होऊ शकतात, असा विश्वास अन्नामलाई यांना आहे. भाजपातून अधिकृतपणे बाहेर पडल्यानंतर इतर पक्षांतील अनेक अनुभवी नेतेही त्यांच्यासोबत येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या नव्या राजकीय वाटचालीची पूर्वतयारी म्हणून, एक नवीन पक्ष नोंदणीकृत करण्याची किंवा आधीच नोंदणीकृत असलेल्या पक्षाचे नाव घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. राजकीय पक्षाच्या स्थापनेपूर्वी एक सामाजिक संघटना देखील सुरू केली जाऊ शकते.
केंद्रीय सरकारने सीबीएसई (CBSE) इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या त्रि-भाषा सूत्रावर (Three-language formula) अन्नामलाई यांनी अलीकडेच टीका केली होती. हा निर्णय तमिळनाडूतील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले होते, तेव्हापासूनच त्यांच्या पुढील राजकीय पावलांविषयीच्या चर्चांना उधाण आले होते.