देशातील प्रख्यात उद्योगपती आणि वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मुलगा अग्निवेशवर यांचे आकस्मिक निधन झाले.  image x
राष्ट्रीय

Vedanta's Anil Agarwal : दिवंगत मुलाच्‍या 'स्‍वप्‍नपूर्ती'साठी 'वेदांता'चे अनिल अग्रवाल करणार ७५ टक्के संपत्ती दान

स्कीइंग अपघातात झालेल्या दुखापतींवर उपचार सुरू असताना अग्निवेश यांचा झाला हृदयविकाराने मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Vedanta's Anil Agarwal

नवी दिल्‍ली : देशातील प्रख्यात उद्योगपती आणि वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मुलगा अग्निवेश यांचे आकस्मिक निधन झाले. आता अनिल अग्रवाल यांनी आपल्या मुलाने पाहिलेले स्‍वप्‍न पूर्ण करण्यासाठी संपत्तीमधील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्कीइंग अपघातात अग्निवेशवर झाले होते जखमी

अमेरिकेतील स्कीइंग अपघातात अग्निवेश जखमी झाले होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात उपचार सुरू होते. ते लवकर बरे होतील, असा कुटुंबीयांना विश्वास होता; पण उपचार सुरू असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाले. अग्निवेशवर यांच्या आकस्मिक निधनाचा अग्रवाल कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते....

आपल्या आयुष्यातील 'सर्वात काळा दिवस' अशी वेदना व्यक्त करत अनिल अग्रवाल यांनी आपल्या 'एक्‍स' पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं म्हटले आहे की, अग्निवेश यांच्यावर न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात उपचार सुरू होते. तो बरा होत आहे, असा कुटुंबाचा विश्वास होता. आम्हाला वाटले होते की, सर्वात वाईट काळ निघून गेला आहे; पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मुलाने वडिलांच्या आधी जगाचा निरोप घेणे योग्य नाही.”

तो माझा अभिमान होता

अग्निवेश यांनी मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फुजैराह गोल्ड ही कंपनी स्थापन केली. यानंतर हिंदुस्तान झिंकचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. अग्रवाल यांनी म्हटले आहे की, माझा मुलगा साधा, प्रेमळ आणि अत्यंत माणूसकी असलेला होता. तो एक खेळाडू, संगीतकार आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जात असे. माझ्यासाठी, तो फक्त माझा मुलगा नव्हता. तो माझा मित्र होता. माझा अभिमान होता. माझे जग होता. मी व माझी पत्नी किरण या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या दुःखात, आम्ही स्वतःला आठवण करून देतो की वेदांतामध्ये काम करणारे हजारो तरुण देखील आमचीच मुले आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

परोपकारी दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा निर्धार अधिकच दृढ

आपल्या संदेशात अग्रवाल यांनी अधोरेखित केले की, या दुर्दैवी घटनेमुळे त्यांनी आपल्या मुलासोबत पाहिलेल्या परोपकारी दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा निर्धार अधिकच दृढ झाला आहे. देशातील कोणतेही मूल उपाशी झोपणार नाही, कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही. प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहील आणि प्रत्येक तरुण भारतीयाला अर्थपूर्ण काम मिळेल, हे सुनिश्चित करण्याचे स्वप्न आम्ही दोघांनी पाहिले होते. आम्ही जे काही कमावतो त्यापैकी ७५% पेक्षा जास्त रक्कम समाजाला परत देऊ, असे वचन मी अग्नीला दिले होते. मी ते वचन आणि अधिक साधे जीवन जगण्याचा माझा संकल्प पुन्हा एकदा दृढ करत आहे.”

तुझ्याशिवाय या वाटेवर कसे चालायचे हे मला माहीत नाही

अग्निवेश याचा आत्मनिर्भर भारतावर दृढ विश्वास होता. आपला देश कोणत्याही बाबतीत कमी का समजावा, असा प्रश्न तो अनेकदा विचारायचा. "तो म्हणायचा, 'बाबा, एक राष्ट्र म्हणून आपल्यात कशाचीही कमतरता नाही. आपण कधीही मागे का राहावे?' त्याच्यासमोर संपूर्ण आयुष्य होते. अनेक स्वप्ने अजून पूर्ण व्हायची होती. अग्निवेशने प्रेरित केलेल्या कार्यामुळे आणि त्याने स्पर्श केलेल्या जीवनांमुळे तो कायम स्मरणात राहील. तुझ्याशिवाय या वाटेवर कसे चालायचे हे मला माहीत नाही," असे त्यांनी आपल्या मुलाला लिहिलेल्या शेवटच्या संदेशात म्हटले, "पण मी तुझा प्रकाश पुढे नेण्याचा प्रयत्न करेन." असा निर्धारही अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT