Extortion Forced Conversion Coach Arrested
आंध्र प्रदेशातील पंचायत राज विभागाचे सहाय्यक अभियंता थिल्लापुडी नूकाराजू यांनी आपल्या कुटुंबासह गोदावरी नदीत उडी घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेत नूकाराजू यांच्यासह पत्नी मीना, मुलगी सौजन्या यांचा मृत्यू झाला. तर मच्छिमारांनी तत्परता दाखवत १० वर्षांच्या नातवाला सुरक्षित बाहेर काढले होते. आता पोलीस तपासात या धक्कादायक घटनेचे गूढ उकलले असून याप्रकरी एका रायफल शूटिंग कोचला पोलिसांनी अटक केली आहे.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती नूकाराजू यांनी जीवन संपविण्यापूर्वीची लिहिलेली चिठ्ठी लागली आहे. या चिठ्ठीत त्यांनी या टोकाचा निर्णय घेण्यामागे रायफल शूटिंग कोच शेख साधिक खान याला जबाबदार धरले आहे.
रायफल शूटिंग कोच शेख साधिक खान याने नूकाराजू यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला तसेच त्यांच्याकडून खंडणीही वसुली केल्याचे जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी साधिक खान याच्याविरुद्ध हत्या आणि खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. त्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली."पाच राज्यांमध्ये पाठलाग केल्यानंतर आरोपीला पकडण्यात यश आले," अशी माहिती काकीनाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) बिंदू माधव यांनी दिली. या मोहिमेसाठी १० पेक्षा जास्त पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. मोबाईल आणि डिजिटल व्यवहारांचा वापर टाळून गुंगारा देणाऱ्या खानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून तपासी अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या.खानला ट्रांझिट वॉरंटवर आंध्र प्रदेशात आणण्यात आले आहे.
खान गेल्या दोन वर्षांपासून नूकाराजू आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. मृत नूकाराजू यांचा नातू शिकत असणार्या शाळेत तो रायफल शूटिंग कोच म्हणून काम करत होता. खानचे या कुटुंबाशी असलेले संबंध, घटनेनंतरच्या त्याच्या हालचाली आणि सुसाईड नोटमधील दाव्यांची पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, माजी खासदार विजयसाई रेड्डी यांनी या प्रकरणात मोठा कट आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करत, सीबीआय (CBI) किंवा एनआयए (NIA) कडून तपासाची मागणी केली आहे. धर्मांतर, खंडणी, शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणार्या १० जणांच्या टोळीत खान सहभागी होता, या टोळीने काकीनाडा आणि राजमहेंद्रवरम परिसरात सुमारे १५ कुटुंबांना लक्ष्य केल्याचा दावाही असे दावाही रेड्डी यांनी केला आहे. तसेच या कारवाया इतर राज्यांमध्ये आणि देशांमध्ये पसरलेल्या असल्याने, हे प्रकरण सीबीआय किंवा एनआयए कडे सोपवावे, अशी मागणही त्यांनी केली आहे.