मुंबई : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे शनिवारी शिर्डीत मुक्कामी असताना त्यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी बंद दाराआड पाऊण तास चर्चा केली. राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेले नुकसान आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
महायुतीतील तीनही प्रमुख पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यावर भर द्यावा, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्याचे समजते. शहा यांनी पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्याला भरीव मदत देण्याची हमी यावेळी दिली. शहा यांचे शनिवारी रात्री शिर्डीत आगमन झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही उपस्थित होते. शिर्डीतील हॉटेल सन अॅन्ड सँड येथे मुक्कामासाठी पोहोचताच, अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेतली. ही बैठक खासगी स्वरूपाची होती. या बैठकीत चौघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रामुख्याने राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले शेतकर्यांचे नुकसान आणि त्यासाठी तातडीने द्यायची मदत यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय स्थितीही शहा यांनी जाणून घेतली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे नियोजन आणि निवडणुकीत तिन्ही पक्षांमधील समन्वय यावरही चर्चा झाली. या निवडणुकांमध्ये शक्यतो निवडणूकपूर्व युती करावी. महायुतीतील तीनही प्रमुख पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यावर भर द्यावा, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्याचे समजते.