Viral News
पिलीभीत: चमत्कार घडत नाहीत असं कोण म्हणतं? उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये असा एक चमत्कार घडला आहे, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ज्या महिलेला डॉक्टरांनी जवळपास 'ब्रेन डेड' घोषित केले होते आणि जिच्या अंत्यसंस्काराची तयारी घरी सुरू झाली होती, तीच महिला रुग्णवाहिकेतून नेताना जिवंत झाली. उपचारानंतर आता ती महिला पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परतली आहे.
पिलीभीतच्या गोकुलपुरम कॉलनीतील रहिवासी विनीता शुक्ला २२ फेब्रुवारी रोजी अचानक घरात बेशुद्ध होऊन पडल्या. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी त्यांना बरेलीतील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती, हात-पाय सुन्न झाले होते. व्हेंटिलेटर काढल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले होते.
डॉक्टरांच्या बोलण्याने कुटुंब पूर्णपणे खचले होते. २४ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. विनीता यांचे पती कुलदीप शुक्ला त्यांना रुग्णवाहिकेतून परत घरी घेऊन जात होते. घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती आणि नातेवाईक अंत्यदर्शनासाठी जमा होऊ लागले होते.
परतत असतानाच अचानक रुग्णवाहिकेला एक मोठा झटका बसला. त्याच वेळी विनीता यांच्या शरीरात हालचाल झाली. त्यांचा श्वास सुरू झाल्याचे पाहून नातेवाईक थक्क झाले. त्यांनी अंत्यसंस्काराऐवजी त्यांना तातडीने पिलीभीत येथील रूग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. रुग्णालयात सलग १४ दिवस उपचारानंतर विनीता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि अखेर त्या पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या.
"महिला ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होते, सर्व तयारी झाली होती. अचानक झटक्यामुळे श्वास परतला आणि रुग्ण माझ्याकडे आला. मलाही आशा नव्हती कारण हात-पाय आणि डोळ्यांच्या बाहुल्या प्रतिसाद देत नव्हत्या. पण नातेवाईकांच्या विनंतीवरून मी त्यांना दाखल करून घेतले. ही ईश्वरी इच्छा आणि कुटुंबीयांचा विश्वास होता, ज्यामुळे महिलेचे प्राण वाचले."— डॉ. राकेश सिंह, (डॉ. राकेश न्यूरो सिटी हॉस्पिटल, पिलीभीत)