पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित १४ संशयितांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी एटीएससह उत्तर प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमधील शहरांमध्ये १७ ठिकाणी छापे टाकले. या ऑपरेशनमध्ये अल कायदा मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.
हे मॉड्यूल रांचीचे डॉ. इश्तियाक चालवत होते. देशाच्या विविध भागात मोठ्या दहशतवादी कारवाया घडवण्याची त्यांची योजना होती. मॉड्यूलच्या सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. राजस्थानच्या भिवडी येथून शस्त्रांचे प्रशिक्षण घेणाऱ्या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांची चौकशी केल्यानंतर स्पेशल सेलच्या पथकाने झारखंड आणि यूपीमध्ये छापे टाकले. या कालावधीत एकूण आठ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या विविध ठिकाणी तपास सुरू असून आणखी संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहे, यात शस्त्रास्त्रे, दारूगोळा, दहशतवादी साहित्य आदींची जप्तीही सुरू आहे.