Al-Falah University Faces NAAC Notice: दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर चर्चेत आलेलं फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ आता नव्या वादात सापडलं आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदने (NAAC) या विद्यापीठावर खोट्या मान्यतेचा दावा केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात NAAC ने विद्यापीठ प्रशासनाला नोटीस बजावून 7 दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा, विद्यापीठाची मान्यता रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाची स्थापना 2014 साली हरियाणा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी अॅक्ट अंतर्गत झाली होती. त्यानंतर 2015मध्ये UGC कडून मान्यता देण्यात आली आणि 2019 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयालाही मान्यता मिळाली.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर “NAAC ग्रेड A” अशी मान्यता असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र NAAC च्या तपासात उघड झालं की विद्यापीठानं कधीही मान्यतेसाठी अर्जच केला नव्हता.
NAAC च्या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं आहे की अल-फलाहच्या इंजिनिअरिंग आणि एज्युकेशन कॉलेजला अनुक्रमे 2018 आणि 2016 पर्यंतच मान्यता होती, जी आता कालबाह्य झाली आहे. तरीही विद्यापीठानं आपल्या संकेतस्थळावर NAAC मान्यता चालू असल्याचं खोटं सांगितलं.
NAAC ने विद्यापीठाला महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. यामध्ये “भविष्यात UGC व NMC कडून मान्यता रद्द करण्याची शिफारस का करू नये?” जर 7 दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर दिलं गेलं नाही, तर अल-फलाह विद्यापीठावर कठोर कारवाई होऊ शकते.