akhilesh yadav rejects dhirendra krishna shastri apology over comparison of lord ram and lord krishna
लखनऊ : पुढारी ऑनलाईन मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे भगवान राम आणि श्रीकृष्ण यांची तुलना करून राम हे कृष्णापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितल्यामुळे वादात अडकले आहेत. याप्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही उडी घेतली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असली, तरी ‘ईश्वरनिंदा’ कधीही माफ केली जाऊ शकत नाही, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
आजीवन बंदी घालण्याची मागणी
अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'मानवी चुकांसाठी माफी दिली जाऊ शकते; मात्र ‘ईश्वरनिंदेसाठी’ कधीही माफी दिली जाऊ शकत नाही. अशा दुष्ट विचारांच्या लोकांवर आजीवन बंदी घालणे हे समाजाच्या हिताचे ठरेल. संपूर्ण देशात त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, नवीन कार्यक्रमांसाठी परवानगी देऊ नये आणि सार्वजनिक जीवनात प्रत्येक खऱ्या सनातनी व्यक्तीने त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकावा. त्यांच्या अक्षम्य पापाची हीच शिक्षा असली पाहिजे. अन्यथा तेही ईश्वरनिंदेच्या पापाचे भागीदार बनून आपले इहलोक आणि परलोक दोन्ही बिघडवून घेतील.'
स्वतःला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ समजू लागले
अखिलेश यादव यांनी पुढे लिहिले की, 'दुर्भावनेने ग्रासलेली अशी व्यक्ती आयुष्यभर एकांतवासात राहून आपल्या कृत्याचा पश्चात्ताप आणि प्रायश्चित्त करत असली, तरी कोणताही धर्मनिष्ठ आणि श्रद्धाळू व्यक्ती तिला माफ करणार नाही. माणसाचा अहंकार इतकाही वाढता कामा नये की, त्याला स्वतःला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ समजू लागावे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.'
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करैरा गावात श्रीराम कथेच्या वेळी भगवान राम आणि श्रीकृष्ण यांची तुलना केली होती. रामकथेच्या दरम्यान धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, 'आमचे राम सरळ आहेत आणि तुमचे कृष्ण वाकडे आहेत. धामही सरळ आहे, अयोध्या; तर तुमच्यांचे वृंदावन.' त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, 'बासरी वाजवणे हा खेळ असू शकतो; पण धनुष्य चालवणे हा खेळ नाही.'
व्हिडिओ जारी करून मागितली माफी
धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानावरून वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले की, ते कृष्णविरोधी नाहीत आणि त्यांनी हे विधान केवळ प्रेमभावनेतून आणि विनोदाने केले होते. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आपण क्षमा मागतो, असे म्हणत त्यांनी हात जोडून माफी मागितली.
अखिलेश यांनी राम-कृष्ण यांची तुलना म्हणजे कट असल्याचे म्हटले
मात्र, धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानाला विरोध वाढतच आहे. त्यांच्या विधानावर मथुरा-वृंदावनमधील संत, कृष्णभक्त आणि अखिल भारतीय यादव महासभेने तीव्र आक्षेप घेतला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही या तुलनेला दुर्दैवी आणि षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले की, 'राजकीय पाठबळ मिळालेली एखादी व्यक्ती स्वतःला लघुबंधू म्हणवून घेत फिरत आहे आणि सनातन समाजाची एकता तोडण्याचे अत्यंत निंदनीय काम करत आहे, ही अत्यंत दुर्दैवी आणि आक्षेपार्ह बाब आहे. सनातन धर्मीयांमधील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे षड्यंत्र कोण रचत आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यामागे कोणती बाह्य शक्ती आहे की अंतर्गत शक्ती, याचा तपास होणे गरजेचे आहे.'