Samajwadi Party Split : उत्तर प्रदेशचे मंत्री ओ. पी. राजभर यांनी उत्तर प्रदेशमध्‍ये समाजवादी पार्टीत फूट पडण्‍याचे भाकित केले. यावर सपाचे अध्‍यक्ष अखिलेश यादव यांनी प्रत्‍युत्तर दिले.  Pudhari
राष्ट्रीय

Samajwadi Party Split : "जो डर जायेगा..." : समाजवादी पार्टी फुटीच्या भाकितावर अखिलेश यादव नेमकं काय म्हणाले?

भाजपशी लढण्यासाठी आम्हाला धाडसी लोकांची गरज

पुढारी वृत्तसेवा

Samajwadi Party Split : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याची चर्चा आहे. आता या राजकीय घडामोडीनंतर तृणमूल काँग्रेसप्रमाणेच समाजवादी पक्षातही (सपा) फूट पडेल, असा उत्तर प्रदेशचे मंत्री ओ. पी. राजभर यांनी बुधवारी राजकीय वर्तुळात दावा करून चर्चांना उधाण आणले. राजभर यांनी केलेल्या पक्षफुटीच्या भाकितावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते मंत्री राजभर?

राजभर यांनी बुधवारी केलेल्या या प्रक्षोभक दाव्यामुळे राजकीय अफवांचे पीक आले आहे. "हे १००% खरे आहे. राजभर जे काही बोलतात, ते धैर्याने आणि सत्याने बोलतात," असे अखिलेश यादव यांचे माजी सहकारी राजभर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. उत्तर प्रदेशचे पंचायती राज आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री राजभर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "रामगोपाल यांनी एक यादी तयार करून गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवली आहे. मी त्या दोघांमधील हास्य पाहिले आहे. जेव्हा दोन मने मिळतात, तेव्हा शब्द शांत राहू शकतात, तरीही संवाद होतो." यादीत नेमकी कोणाची नावे आहेत किंवा ते या निष्कर्षापर्यंत कसे पोहोचले, हे स्पष्ट न करता राजभर पुढे म्हणाले, "या पत्रात असे म्हटले आहे की, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये आणि हे नेते तुमच्या पक्षात सामील होण्यास तयार आहेत."

पक्ष फोडणे, हीच भाजपची कार्यपद्धती

अखिलेश यादव यांनी सुरुवातीला राजभर यांच्या वक्तव्याची "ही मालिका आणखी किती काळ चालणार?" अशी मिश्किल टिप्पणी करत थट्टा उडवली. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितले की, भाजपने यापूर्वीही सपाच्या नेत्यांना आपल्या गोटात ओढले आहे. पक्ष फोडणे, हीच भाजपची कार्यपद्धती आहे. त्यांनी भूतकाळातही आमचे खासदार आणि आमदार फोडले आहेत."

"जो डर जायेगा, वो भाग जायेगा"

"जो डर जायेगा, वो भाग जायेगा" (जे घाबरतील ते सोडून जातील) असे स्पष्ट करत भाजपशी लढण्यासाठी आम्हाला धाडसी लोकांची गरज असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले.

रामगोपाल यादवांनीही दावे फेटाळले

यापूर्वी रामगोपाल यादव यांनीही राजभर यांचे दावे फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते की, "मी कोणतेही पत्र सादर केले आहे का, हे तुम्ही अमित शाह जी यांना विचारले पाहिजे. देशात ओमप्रकाश राजभर यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. ते नेहमी असेच बोलतात. आपण काय बोलत आहोत हे त्यांचे त्यांनाच समजत नाही." सपा नेत्यांनी पक्षात सर्व काही ठीक असल्याचे सांगत हे केवळ अफवांचे पेव असल्याचे म्हटले आहे. "कोणतीही समस्या नाही आणि होणारही नाही. ते फक्त अफवा पसरवतात. जनता त्यांना नक्कीच खडे बोल सुनावेल," असेही ते म्हणाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT