नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जवळपास दोन वर्षांनंतर सोमवारी भारत-रशियादरम्यान द्विपक्षीय, क्षेत्रीत तसेच अफगाणिस्तानसह विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राजधानी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांचे समकक्ष रशियाचे संरक्षणमंत्री जनरल सर्गेई शोहगू तसेच परराष्ट्रमंत्री सर्गी लेवरोव यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध संरक्षण करारांवर स्वाक्षर्या झाल्या. बैठकीदरम्यान 'एके-203' खरेदीसंबंधी महत्त्वाचा करारदेखील करण्यात आला. या करारानंतर भारतीय संरक्षण दलाला आणखी बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उभय देशांदरम्यान संरक्षण सहकार्य भागीदारी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासह एक स्थिरत्व प्रदान करण्याचे कार्य ही भागीदारी करेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. भारत-रशिया संबंधांसाठी सद्यस्थितीत लष्कर आणि तांत्रित क्षेत्रात सहकार्य विशेष रूपाने महत्त्वाचे आहे. दोन्ही देश क्षेत्रीय सुरक्षेसह पुढे वाटचाल करतील, असा विश्वास रशियाचे संरक्षणमंत्री जनरल सर्गेई शोहगू यांनी व्यक्त केला. बैठकीदरम्यान भारत-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 6 लाख 1 हजार 427 (7.6339 मि.मी.) असॉल्ट रायफल एके-203 च्या खरेदीसह 2021-31 लष्कर तांत्रिक सहकार्य कार्यक्रमासारख्या करारांवर स्वाक्षर्या झाल्या.
उत्तर सीमेवर लष्कराची जमवाजमव, दारूगोळ्याचा साठा आणि विनाकारण आगळीक देशासमक्ष प्रमुख आव्हान आहे. भारत आपल्या द़ृढ राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर आव्हानांचा सामना करण्यासाठी आश्वस्त आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दल विस्तृत चर्चा झाल्याचे रशियाचे सर्गेई शोहगू म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांच्यात विश्वासाचे नाते आहे. दोन्ही देशांदरम्यान जी भागीदारी झाली आहे, ती बरीच विशेष आहे, अशी भावना परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली. या शिखर संमेलनातून महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत द्विपक्षीय संबंध तसेच उभय देशांमध्ये सहकार्याच्या स्थितीवर समाधान व्यक्त केले.
दिल्लीतील सुषमा स्वराज भवनात आयोजित 'टू प्लस टू' चर्चेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित केला. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचा प्रभाव मध्य आशिया देशांवर दिसत आहे. आसियान केंद्रीयतेत भारत तसेच रशियाचे समान हित आहे. दोन्ही देशांतील नागरिकांसाठी शांती, प्रगती तसेच समृद्धी निश्चित करण्याचे काम महत्त्वाचे आहे. जगात सातत्याने बदल होत असताना भारत आणि रशियाचे संबंध घनिष्ठ झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये राजकीय पातळीवर सक्रियता, संवाद तसेच अनेक वर्षांपासून मजबूत संरक्षण भागीदारी आहे. भारत-रशिया परस्पर चर्चेसाठी एक उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध करवून दिल्याचे डॉ. जयशंकर म्हणाले.