नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. हे प्रकरण आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य यादीत होते. मात्र मुख्य यादीत हे प्रकरण येऊ शकले नाही. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने हे प्रकरण न्यायालयासमोर नमूद करण्यात आले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आमच्या काही उमेदवारांनी एबी फॉर्मसह अर्जही दाखल केले आहेत, असे म्हणत अजित पवार गटाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणावर सुनावणीसाठी नवी तारीख दिली जाणार आहे. मात्र या क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार यावर न्यायालय काही निर्णय देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तूर्त अजित पवार गटाला हा मोठा दिलासा मानला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे यासंदर्भातली एक याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. याच याचिकेमध्ये शरद पवार गटाचे वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी एक अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाऐवजी नवे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी करत असेलेले न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्यासमोर हे प्रकरण नमुद करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने अजित पवार गटाला नोटीसही बजावत उत्तरे सादर करण्यास सांगितले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा निकाल निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये दिला होता. या निकालानुसार अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानून त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर या निकालाविरुद्ध शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली नाही. मात्र हे सांगितले की आम्ही निर्णय देईपर्यंत अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह वापरू शकेल.
दरम्यान, शरद पवार गट नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करू शकतो. त्यानुसार शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. निवडणूक आयोगाने त्यांना 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' हे नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आले. पुढे लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार गट घड्याळ चिन्ह वापरत असताना त्याखाली 'हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे' असे लिहिण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या मुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी १२ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी एक अर्ज नमूद करून घेतला.