Airtel, Jio Vodafone-Idea network down
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्या – Airtel, Jio आणि Vodafone-Idea – यांचे नेटवर्क सोमवारी दुपारी अचानक डाऊन झाले. यामुळे देशभरातील लाखो वापरकर्त्यांना कॉल करता येत नाही आणि इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू या प्रमुख शहरांसह चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी आणि मदुरई येथेही मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.
सध्याच्या घडीला या समस्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीवरून ही तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे.
Airtel ने अधिकृतपणे याची कबुली दिली असून, त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर "आम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल खेद आहे, आमचा तांत्रिक विभाग सेवा सुरळीत करण्यासाठी काम करत आहे," असे म्हटले आहे.
Airtel वापरकर्त्यांना दुपारी साडेतीनच्या सुमारास अडचणी जाणवायला लागल्या. Downdetector या outage ट्रॅकरनुसार, सुमारे 3,600 वापरकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये:
51 टक्के लोक कॉल करू शकत नव्हते
31 टक्के लोकांना इंटरनेट वापरता येत नव्हते
तर 18 टक्के वापरकर्त्यांच्या मोबाइलवर सिग्नलच नव्हता
Jio च्या बाबतीत, सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सेवा खंडित झाली. Downdetector वर 200 हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. या तक्रारींचे स्वरूप:
54 टक्के जिओ वापरकर्त्यांना इंटरनेट मिळत नव्हते,
33 टक्के परकर्ते JioFiber कनेक्शन वापरू शकत नव्हते,
13 टक्के वापरकर्ते कॉल करू शकत नव्हते.
Vodafone-Idea चा प्रभाव तुलनेने कमी होता. दिल्लीत, मुंबईत, कोलकात्यात, बेंगळुरू, चेन्नई आणि जयपूरमध्ये ही समस्या दिसून आली, परंतु संख्येने कमी तक्रारी (सुमारे 50) नोंदवल्या गेल्या.
Airtel ने तांत्रिक अडचणीची कबुली दिली असून, सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. Jio आणि Vodafone-Idea कडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
कॉल्स आणि इंटरनेट सेवा अचानक बंद झाल्यामुळे सोशल मिडियावर वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी X, Facebook आणि अन्य सोशल प्लॅटफॉर्मवर आपले अनुभव शेअर करत कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.